पारगड येथे किल्ल्याचे पहिले किल्लेदार रायाजी उर्फ रायबा मालुसरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन प्रसंगी सुनील मालुसरे व दुर्गप्रेमी |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
"आकाशात चंद्र, सूर्य असेपर्यंत गड राखा" हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश शिरसावंद्य मानून पाचशे मावळ्यांसह स्वराज्यातील हा किल्ला अभेद्य ठेवण्याचा पराक्रम पारगड चे पहिले किल्लेदार सुभेदार रायाजी उर्फ रायबा मालुसरे यांनी केला. त्यांच्या स्मृति जपण्यासाठी किल्ले पारगड येथे त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय चंदगड तालुक्यातील दुर्गप्रेमी, शिवप्रेमी व मालुसरे कुटुंबीय यांनी घेतला आहे. स्मारकाचे भूमिपूजन चंदगड तालुक्यातील दुर्गप्रेमी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज सुनील मालुसरे यांच्या हस्ते किल्ले पारगडवर नुकतेच पार पडले.
४ फेब्रुवारी १६७० रोजी सिंहगडच्या लढाईत तानाजी मालुसरे शहीद झाल्यानंतर १६७४ मध्ये छ. शिवाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, इंग्रज व कर्नाटकवर वचक ठेवण्यासाठी दूरदृष्टीने तिन्ही राज्यांच्या सीमेवरील या किल्ल्याची निर्मिती केली. दक्षिण मोहिमेवर आलेल्या महाराजांनी ५०० मावळे दिमतीला देत तानाजींचे पुत्र रायाजी यांना पहिले किल्लेदार म्हणून नेमले. स्वराज्यातील ते सर्वात तरुण किल्लेदार म्हणून ओळखले जातात. अनेक शत्रूंनी हा गड ताब्यात घेण्यासाठी आक्रमणे केली. पण शूर मावळ्यांच्या मदतीने महाराजांच्या आज्ञेप्रमाणे रायाजींनी गड राखला. स्वराज्याचे आरमार दल व तोफखाना दलातील प्रमुखांसाठी पारगड हे त्याकाळी महत्त्वाचे केंद्र होते. रायाजी यांचे या किल्ल्यावर सुमारे साठ वर्षे वास्तव्य होते असे मानले जाते. त्यांची तेरावी पिढी सध्या येथे कार्यरत असून शेलार, शिंदे, आढाव, माळवे, नांगरे, जांभळे, डांगे, कुबल, झेंडे, गडकरी, चिरमुरे, तांबे, चव्हाण आदी सर्व मावळ्यांचे वंशज कोणत्याही शासकीय मदतीशिवाय साडेतीनशे वर्षांनंतरही आजही पारगड वर वास्तव्य करून आहेत.
पराक्रमी असूनही इतिहासात दुर्लक्षित राहिलेले रायबा यांचे स्मारक चंदगड तालुक्यातील दुर्गप्रेमी व मालुसरे कुटुंबीयांनी हाती घेतले आहे. लोकसहभागातून साकारणाऱ्या या योद्ध्याच्या स्मारक स्थळी त्यांचा पुतळा उभारून ऐतिहासिक हत्यारे व वस्तू ठेवण्याचा मानस आहे. समाजातील दानशूर संस्था व व्यक्तींनी याकामी सहकार्य करावे. असे आवाहन दुर्गप्रेमी व मालुसरे कुटुंबीयांच्या वतीने सुनील मालुसरे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment