कडोली साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. दिनेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

28 December 2023

कडोली साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. दिनेश पाटील



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      कडोली येथील मराठी साहित्य संघातर्फे रविवार दि. ७ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या ३९ व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वारणानगर येथील लेखक व संशोधक प्रा. दिनेश पाटील भूषविणार आहेत.

     प्रा. पाटील हे वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे ते सदस्य आहेत. ‘अस्पृश्य जाती’, ‘दूधपंढरी’, आधुनिक भारताचे शिल्पकार महाराजा सयाजीराव गायकवाड, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या सुधारणा, सर्जक पालवी, जगावेगळा राजा, सयाजीरावांची ओळख असे त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. अनेक ग्रंथांचे संपादक म्हणून त्यांनी कार्य केले आहे. याबरोबरच त्यांचे अनेक संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

        यावर्षीचे कडोली मराठी साहित्य संमेलन एकूण ४ सत्रात होणार आहे. दरवर्षी प्रमाणे ग्रंथदिंडी होणार यामधे विविध वेशभूषा सह सर्व विद्यार्थी सह संपूर्ण कडोली गाव सहभागी होणार आहे. त्यानंतर पहिल्या सत्रात उद्घाटन समारंभ व अध्यक्षीय भाषण होईल. दुसऱ्या सत्रात संदीप कदम (ठाणे) यांचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्याख्यान तिसऱ्या सत्रात नवोदितांचे कथाकथन यामधे समृद्धी पाटील वैभवी मोरे कुशल गोरल हे विध्यार्थी सहभागी होत आहेत व चौथ्या सत्रात निमंत्रित कवींचे कविसंमेलन होणार आहे. यामधे स्वप्निल चौधरी प्रशांत केदळे गुंजन पाटील ही मान्यवर कवी सहभागी होत आहेत. साहित्य संघांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संमेलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली.

        यावेळी प्रा. बाबुराव नेसरकर, सतीश सावंत, अनिल कुट्रे, संघाचे विद्यमान अध्यक्ष अरुण पाटील, स्वागताध्यक्ष शिवराज कालकुंद्रीकर, माजी अध्यक्ष बसवंत शहापूरकर, माजी अध्यक्ष बाबुराव गौंडवाडकर, कार्याध्यक्ष शिवाजी कुट्रे, उपाध्यक्ष भरमाणी डोंगरे, सचिव किशोर पाटील, सहसचिव गिरीधर गौंडवाडकर, खजिनदार विलास बामणे, उपखजिनदार अनिरुद्ध पाटील, सदस्य महादेव चौगुले, किरण पवार, तानाजी कुट्रे, मोहन पाटील, संभाजी पवार, अनिल डंगरले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment