वक्तृत्व कला ही विचारांचा जागर घडवणारी कला - प्रा. डॉ. पी. आर. पाटील, माडखोलकर महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2023

वक्तृत्व कला ही विचारांचा जागर घडवणारी कला - प्रा. डॉ. पी. आर. पाटील, माडखोलकर महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

 चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          "वक्तृत्व कला विचारांचा जागर घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची कला आहे. नेतृत्वगुणांचा विकास वक्तृत्वातूनच होत असतो. समाजालाजोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वक्तृत्वाच्या माध्यमातून घडते. स्पर्धेतील हार जीत महत्त्वाची नसून स्पर्धक शब्दांच्या माध्यमातून आपली वैचारिक, सामाजिक बांधिलकी कशाप्रकारे प्रकट करतात हेच महत्त्वाचे आहे. ही कला आयुष्यभर सोबत करणारी असून आत्मविश्वासाचे वरदान देणारी आहे. विद्यार्थ्यांनी या कलेची जोपासना करावी तसेच जीवनात आदर्श, नीती मूल्ये जतन करावीत."असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलककर महाविद्यालयातील स्व. र. भा. माडखोलकर यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्ष म्हणून बोलत होते. 

       यावेळी उद्घाटक आर. पी. बांदिवडेकर यांनी संस्थेची गुणात्मक वाढ आणि संस्थेने आजवर जपलेला विचारांचा वारसा यांचा उल्लेख केला.  खेडूत शिक्षण मंडळ ही संस्था मूल्यनिष्ठा महत्वाची मानते असे सांगून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले.

     एस. व्ही. गुरबे यांनी हा उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेत सहभाग घेण्याची व व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याची गरज विशद केली. उद्योजक सुभाष गावडे या माजी विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या सर्वच उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच या महाविद्यालयाशी आपली नाळ कायमची जोडलेली आहे असे भावपूर्ण उद्गार काढले. या स्पर्धेसाठी व्ही. आर. बांदिवडेकर, सुभाष गावडे, मारुती माडखोलकर व वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विजय कांबळे यांनी बक्षीस दिले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन झाले. विद्यार्थ्यांनी महात्मा फुलेंचे क्रांती गीत सादर केले. 

       स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. बी. आर दिवेकर, एम. एन. शिवनगेकर, डॉ. एन. एस. मासाळ यांनी काम पाहिले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ए. डी. कांबळे यांनी केले. डॉ. टी. एम. पाटील यांनी आभार मानले. श्रीनिवास पाटील, के. के. चंदगडकर, अनिल पाटील, पी. पी धुरी यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांचे लक्षणीय उपस्थिती होती. समन्वयक प्रा. एल. एन. गायकवाड, डॉ. टी. ए. कांबळे, डॉ. ए. वाय. जाधव, पी. ए. निटुरकर, एम. एम. हांडे, एम. एम. पीरजादे यांनी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले. 

     स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- प्रथम- गायत्री बिर्जे, द्वितीय- सुफिया नाईकवडी, तृतीय- विवेकानंद पाटील, उत्तेजनार्थ संकेत पाटील व आर्या साबळे. मान्यवराच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

No comments:

Post a Comment