कुदनूर, खन्नेटी, हंदिगनूर रस्त्याची झालेली दुरवस्था |
कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर ते हंदिगनूर हा रस्ता बऱ्याच वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण मजबुतीकरण व डांबरीकरण कधी होणार? असा सवाल कुदनूर परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.
कालकुंद्री, कोवाड, कुदनूर, खन्नेटी परिसरातील वाहनधारक व नागरिकांना बेळगावला जाण्यासाठी कुदनूर, खन्नेटी, हंदिगनूर ते बेळगाव हा सर्वात जवळचा व सोयीचा मार्ग आहे. ब्रिटिश काळापासून बेळगाव बाजारपेठेतून बाजारहाट त्याचबरोबर बैलगाडीतून गुळ, भाजीपाल्याची आवक जावक याच रस्त्याने होत आली आहे. त्या मानाने भागातील इतर रस्ते सुधारले पण हा रस्ता दुर्लक्षित राहिला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता दिवसेंदिवस अरुंद होत चालला आहे. रस्त्यातील उखडलेली खडी, दगडधोंडे व खड्ड्यांमुळे वाहने चालवणे दुरापास्त झाले आहे.
हा रस्ता होणार म्हणून अनेक वेळा नारळ फुटले, पण प्रत्यक्षात रस्ता मात्र अपूर्णच आहे. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्ता होणार, निधी जमा झाला आहे, अशा चर्चा शेवटी अफवाच ठरल्या आहेत. या कामी कुदनूर ग्रामस्थांनी कर्नाटकातील बेळगाव चे खासदार व आमदार चंदगडचे आमदार व खासदार यांना निवेदन देऊनही आश्वासना पलीकडे काही मिळाल्याचे दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. लवकरात लवकर हा रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण करावा अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment