रस्त्यात सापडलेला सोन्याचा दागिना केला परत...! चंदगडच्या आदम बेग यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक - चंदगड लाईव्ह न्युज

21 December 2023

रस्त्यात सापडलेला सोन्याचा दागिना केला परत...! चंदगडच्या आदम बेग यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

आदम बेग यांच्या प्रामाणिकपणा बद्दल सत्कार करताना शरद हदगल, शेजारी नौशाद मुल्ला, अशोक दळवी, मजीद अत्तार.
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
      मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील रस्त्यात पडलेला सोन्याचा दागिना प्रामाणिकपणे परत केल्याची घटना चंदगड येथे काल दि. २० रोजी घडली.
    चंदगड येथील अमृता अशोक दळवी या नेहमीप्रमाणे छत्रपती संभाजी चौक ते चंदगड फाटा मार्गावर भल्या पहाटे फिरायला गेल्या होत्या.  घरी येऊन पाहतात तो मंगळसूत्र गळ्यात नाही. त्यांनी लागलीच घरात  शोधा शोध सुरू केली पण शोध लागला नाही. काही वेळात त्यांच्या लक्षात आले की मॉर्निंग वॉकला जाताना मंगळसूत्र गळ्यात होते. घाई गडबडीत त्या पुन्हा आल्या पावली फिरायला गेलेल्या मार्गाने शोध घेण्यासाठी बाहेर पडल्या, पण त्यांना यश आले नाही. दरम्यान दीड तास निघून गेला होता. मंगळसूत्र सापडण्याची आशा त्यांनी सोडली होती. तरीही घरातील व शेजारी मंडळींच्या सुचनेवरून मंगळसूत्र हरवल्याची बातमी व्हाट्सअप ग्रुप वरून व्हायरल केली. 
  या सोशल मीडियाचा योग्य तो परिणाम झाला. सामाजिक कार्यकर्ते व चंदगड अर्बन बँकेचे मॅनेजर  नौशाद मुल्ला यांनी आपण  नमाजला गेलो असता आदम बेग यांना मंगळसूत्र सापडल्याची माहिती अशोक दळवी यांना दिली व त्यांच्याकडून ते घेण्यास सांगितले.
 मंगळसूत्र आणायला जातानाच अशोक दळवी यांनी बेग यांना देण्यासाठी सोबत दहा हजार रुपये घेतले. मंगळसूत्र परत केल्याच्या बदल्यात देऊ केले. पण प्रामाणिक बेग यांनी ते नम्रतापूर्वक नाकारले. शेवटी दळवी यांच्या आग्रहाखातर १० हजार पैकी समाजासाठी ३ हजार रुपये,  एका लकवा  पीडित रुग्णाला २ हजार रुपये तर ५ हजार रुपये रवळनाथ मंदिराला दान करण्यास सांगितले. 
    हा प्रकार समजताच चंदगड शहरात आदम बेग यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी त्यांचा शरद हदगल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.


No comments:

Post a Comment