निमित्त विस्तारित वास्तूच्या उद्घाटनाचे - विशेष वृत्त
शब्दांकन - प्रा. एस. व्ही. कुलकर्णी
खेडूत शिक्षण मंडळ संचलित र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचा विस्तारित नूतन वास्तूचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न होतो आहे. दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव या सोहळ्याचे उद्घाटक आहेत. आमदार अरुण अण्णा लाड व आमदार जयंत आसगावकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ॲड. एस. आर. पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील हे स्वागताध्यक्ष आहेत.
महाविद्यालयाला मान्यता व मंजुरी मिळावी म्हणून सातत्याने तत्कालीन संचालक मंडळाने पाठपुरावा केला होता. पण त्याला यश येत नव्हते. जेव्हा सत्तांतर झाले व मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात आमदार भरमूअण्णा पाटील यांची रोजगार हमी योजना राज्यमंत्री म्हणून निवड झाली. तेव्हा महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी त्यांनी शर्थीने प्रयत्न केले व १९९७ पासून तीनही शाखा असणारे तालुक्यातील एकमेव महाविद्यालय चंदगड येथे सुरू झाले. सुरुवातीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आता नामांतर होऊन र. भा. माडखोलकर महाविद्यालय या नावाने कार्यरत आहे. या महाविद्यालयाने २५ वर्षांची वाटचाल पूर्ण केली. गेल्या वर्षीच महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला.
'तपसा प्राप्यते यशः' या बोधवाक्याप्रमाणे महाविद्यालयाने लौकिक संपादन करण्यासाठी खडतर तपश्चर्या केली आहे. सुरुवातीच्या अभावग्रस्त अवस्थेत समाजातील दानशूर व्यक्ती, हितचिंतक, आजी-माजी विद्यार्थी या सर्वांनीच मोलाचा हातभार लावला. स्व. र. भा. माडखोलकर यांच्या कल्पकतेतून अनेक उपक्रम राबवले गेले. त्यातूनही महाविद्यालयाच्या मदतीसाठी नाटक, जादूचे प्रयोग, उच्चपदस्थ माजी विद्यार्थ्यांना आवाहन अशा अनेक मार्गाने अविरत प्रयत्न केले गेले. विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणाऱ्या प्राध्यापक, कर्मचारी यांच्या अडचणींचे निराकरण करणे, त्यांना यथाशक्ती मदत करणे, मुख्यत्वे करून त्यांचे मनोबल टिकवून ठेवणे, याला सातत्याने प्राधान्य दिले.
संस्थेच्या पारदर्शक कारभार पद्धतीमुळे वेळोवेळी संचालक मंडळाने सभा घेतल्या. एकीकडे हे सारे सुरू असतानाच महाविद्यालयाने नॅक मूल्यांकनालाही महत्व दिले. आपल्या कार्याचे परीक्षण होईल, आपल्याला मार्गदर्शन मिळेल तसेच आत्मपरीक्षणाची संधी प्राप्त होईल अशा सकारात्मक विचारानेच महाविद्यालय नॅक मूल्यांकनास सामोरे गेले.
सातत्याने चढत्या श्रेणीत महाविद्यालयास मानांकन मिळाले. केवळ पुस्तकी किडा असणारे विद्यार्थी घडविणे ऐवजी कला, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रात या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक प्रगती केली आहे. माती परीक्षण कार्यशाळा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कृषी विषयक कार्यक्रम, विवेक वाहिनी,पर्यावरण जागृती, युवा महोत्सवाचे आयोजन, चर्चासत्रे, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, राष्ट्रीय सेवा योजना शिबिरे, भित्तीपत्रके, तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने अशा अनेक उपक्रमाद्वारे हे महाविद्यालय समाजाशी अतूट धाग्याने जोडले गेले आहे.
झवलेसे रोप लावियले द्वारी!
तयाचा वेलू गेला गगनावरी!
ही ज्ञानेश्वरांची ओवी सार्थ ठरावी अशीच ही वाटचाल अभिमानास्पद आहे. आपल्या सर्वसमावेशक धोरणाने बदलत्या काळातील आव्हानांचा यशस्वी मुकाबला करून हे महाविद्यालय विद्यार्थी हा केंद्रबिंदू म्हणून अविरत कार्यरत राहील असा विश्वास वाटतो. प्रभारी प्राचार्य एस. के. सावंत, पहिले नियमित प्राचार्य डॉ. एस. पी. बांदिवडेकर व विद्यमान प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी महाविद्यालयाच्या जडणघडणीत व महाविद्यालय समाजाभिमुख करण्यात फार मोठे योगदान दिले आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन मानून जी शैक्षणिक चळवळ निर्माण झाली, त्याचेच हे फलित मानावे लागेल. मजल दरमजल करीत महाविद्यालयाने आजचा हा टप्पा गाठला आहे.
मै अकेला ही चला था जानिब-ए- मंजिल मगर
लोग साथ आते गये और कारवा बनता गया
या मजरुह सुलतानपुरींच्या काव्यपंक्तींचीआठवण यावी अशी सुरुवातीची महाविद्यालयाची खडतर वाटचाल आता मात्र सुकर होईल. कारण आता महाविद्यालयाच्या प्रगतीची साक्ष आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. प्रगतीची ही वाटचाल अधिकाधिक प्रशस्त होईल असा आशावाद व्यक्त करतो आणि हा लेखन प्रपंच पुरा करतो.
No comments:
Post a Comment