पार्ले येथे महाकाय किंग कोब्रा ला पकडताना आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर यांचे चिरंजीव संदीप टक्केकर
श्रीकांत पाटील / चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चार दिवसांपूर्वी पार्ले, ता. चंदगड येथे किंग कोब्रा अर्थात नागराज सर्प आढळला. चंदगड तालुक्यात प्रथमच आढळलेल्या तब्बल १२ फूट लांबीच्या महाकाय किंग कोब्रा ला शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे धाडस ढोलगरवाडी येथील सर्पमित्र संदीप बाबुराव टक्केकर यांनी दाखवले. यापूर्वी कर्नाटकातील खानापूर व सह्याद्री घाट माथ्यावरील जंगलात आढळणारा सर्वात जहाल विषारी किंग कोब्रा चंदगडात आढळल्याने तो भीतीयुक्त चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र या घटनेने 'झू अथॉरिटी ऑफ इंडिया, नवी दिल्ली' यांनी मान्यता रद्द केलेल्या ढोलगरवाडी (ता. चंदगड) सर्पोद्यान चे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
शेतकरी शिक्षण मंडळाने ढोलगरवाडीत सुरू केलेल्या मामासाहेब लाड विद्यालयाला जोडून संस्थेचे संस्थापक सचिव, शिक्षक व आद्य सर्पमित्र कै बाबुराव सट्टूपा टक्केकर यांनी ग्रामस्थांचा विरोध पत्करून सन १९६६ मध्ये शाळेला संलग्न सर्पोद्यान सुरू केले होते. येथील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून गेल्या साठ वर्षांत हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनी सर्पमित्र बनले आहेत. ते जगाच्या कानाकोपऱ्यात नोकरी, व्यवसाय निमित्त गेलेल्या ठिकाणी सर्पमित्र म्हणून लाखो सापांना जीवदान देत आहेत. दरवर्षी नागपंचमीला येथे सर्प ही राष्ट्रीय संपत्ती असून त्यांचे जतन झाले पाहिजे, यासाठी विविध जातींच्या सापांची माहिती दिली जाते. हे काम आजतागायत सुरूच आहे. याची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था व प्रसिद्धी माध्यमांनीही घेतली आहे. तथापि केंद्रीय वन्यप्राणी संग्रहालय विभाग तथा झू अथॉरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली यांनी अनेक जाचक अटी लादून ते बंद करण्याचा विडाच उचलला आहे. सर्पोद्यानची मान्यता रद्द करण्याची कारवाई गेल्या चार-पाच वर्षात सुरू आहे. ही कारवाई थांबवून मुदतवाढ मिळवण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांची सर्वोच्च न्यायालयापर्यंत केविलवाणी धडपड सुरू आहे.
पर्यावरण साखळीत सापाला सर्वोच्च महत्त्व आहे. त्यांचे जतन या सर्पशाळेच्या माध्यमातून होते.. एका अर्थाने वन्य प्राणी मंत्रालयाचेच काम ही संस्था करत असताना त्यांची मान्यता रद्द करणे कितपत योग्य आहे? असा सवाल पर्यावरण व सर्प प्रेमींतून व्यक्त होत आहे. सर्पालय प्रमुख संदीप टक्केकर व प्रा सदाशिव पाटील सारखे सर्पमित्र हजारो सापांना जीवदान देण्याबरोबरच सापांबद्दल समाजात असलेल्या अंधरुढी, परंपरा, गैरसमज दूर करण्यासाठी पदरमोड करून धडपडत आहेत. एका दृष्टीने शासनाचेच काम विनामूल्य करत आहेत. हे ओळखून वन विभाग, वन्यजीव मंत्रालय, झू अथॉरिटी, महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्याकडून या संस्थेला हे प्रबोधनाचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी भरघोस आर्थिक अनुदान व विविध जातीच्या सापांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध करून देण्यासाठी पुरेशी जमीन विनामूल्य देणे करणे गरजेचे आहे.
तर काय बिघडले....!
ढोलगरवाडी सर्पोद्यान तथा सर्प शाळेमुळे जर दरवर्षी लाखो सापांचे जीव वाचत असतील तर अभ्यासासाठी त्यांनी विविध जातीचे १०-१५ साप इथे ठेवले तर काय बिघडले! असा सवाल तालुक्यातील सर्प प्रेमी व पर्यावरण प्रेमींनी केला असून याकामी पुरेशा अनुदानाची तरतूद करावी, अशी मागणी केली आहे.
पर्यटनास चालना
चंदगड तालुक्यातील निसर्ग सौंदर्य, किल्ले, धार्मिक स्थळे, धबधबे आदी पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्यात अत्याधुनिक सुविधा युक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्पालय झाल्यास येथे पर्यटकांना एक वेगळा अनुभव मिळेल. याशिवाय याचा उपयोग आर्मी, पोलीस, वनाधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, डॉक्टर, फायर ब्रिगेड, सर्प अभ्यासक व संशोधक यांना मिळत आहे. तो अधिक सक्षमतेने मिळू शकेल.
असाही योगायोग
सर्पमित्र संदीप टक्केकर यांनी पार्ले येथे खतरनाक 'किंग कोब्रा' ला अर्जुन टक्केकर यांच्या सहकार्याने सहजगत्या पकडल्यानंतर एक दुर्मिळ योगायोग निर्माण झाला. तो म्हणजे आद्य सर्पमित्र व संदीप यांचे वडील कै बाबुराव टक्केकर यांनी ४३ वर्षांपूर्वी म्हणजे सन १९८० मध्ये खानापूरच्या जंगलात बंधू तानाजी वाघमारे (टक्केकर) यांच्या सहकार्याने १३ फूट लांबीचा मादी 'किंग कोब्रा' पकडला होता. अशा रीतीने बाप व बेटा यांनी 'जहाल विषारी महाकाय किंग कोब्रा'ला पकडण्याचे हे जगातील दुर्मिळ उदाहरण असेल.
No comments:
Post a Comment