सावंतवाडी येथे मंत्री दिपक केसरकर यांच्या भेटीप्रसंगी विद्याधर बाणे व सहकारी.
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
गेली पाच वर्षे पारगड ते मोरले रस्त्याचे काम रखडले आहे. याच्या पूर्णत्वासाठी शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी पारगड, मिरवेल, नमखोल ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच विद्याधर बाणे, बुधाजी पवार, मनोहर पवार, आत्माराम बाणे व ग्रामस्थांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत हे काम तात्काळ मार्गी लावू असे आश्वासन दीपकभाई केसरकर यांनी शिष्टमंडळास दिल्याची माहिती विद्याधर बाणे यांनी दिली आहे.
किल्ले पारगड ते मोर्ले या ८ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम कोट्यावधी रुपये खर्च करून चार वर्षांपूर्वी करण्यात आले होते. तथापि त्यानंतर वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाची अनास्था आणि समन्वयाचा अभाव यामुळे काम रखडले आहे. परिणामी झालेला कोट्यावधी रुपयांचा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हे टाळण्यासाठी रस्ता काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी पारगड, मिरवेल, नमखोल, हेरे, ईसापूर, मोर्ले, घोटगेवाडी परिसरातील ग्रामस्थांसह आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्या अनुषंगाने विद्याधर बाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्री केसरकर यांची भेट घेतली.
हा रस्ता झाल्यास कोल्हापूर,चंदगड ते दोडामार्ग गोवा हे अंतर २५ किलोमीटरने कमी होणार आहे. कोणत्याही धोकादायक घाटाची भिती उरणार नाही. हा रस्ता झाल्यास परिसरातील गावातील नागरिकांना रोजगाराच्या व दळणवळणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हा रस्ता व्हावा, अशी मागणी गेली जवळपास ५० वर्षे सुरू आहे.
No comments:
Post a Comment