राजगोळी येथील विवाहितेची आत्महत्या; पतीसह ५ जणांवर गुन्हा - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2024

राजगोळी येथील विवाहितेची आत्महत्या; पतीसह ५ जणांवर गुन्हा

    


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा  

   राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील विवाहित महिलेने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १/१/२०२४ रोजी उघडकीस आली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल संशयित आरोपी विवाहितेचा पती, सासू-सासरे आदी पाच जणांवर चंदगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

     याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, सुरूते (ता. चंदगड) येथील गजानन रघुनाथ पाटील यांची मुलगी निकिता हिचा विवाह राजगोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील हणमंत धाकलू पाटील यांच्याशी दि. ४/५/२०२३ रोजी झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींकडून निकिता हिचा जाच हाट सुरू झाला. पती हणमंत, सासरे धाकलू कल्लाप्पा पाटील, सासू बाळाबाई धाकलू पाटील (राजगोळी बुद्रुक) तसेच चंद्रभागा रामा कोकितकर व रामा नागोजी कोकितकर (रा. मनगुत्ती, ता. हुक्केरी, जि बेळगाव) यांच्याकडून मारझोड व शिवीगाळ सुरू झाली. तिला अर्धपोटी किंवा उपाशी ठेवणे, नवीन बुलेट गाडी घेण्यासाठी एक लाख रुपये माहेरवरून आणावेत, दिवाळी सणाच्या वेळी अंगठी तसेच पेहराव केला नाही. आदी कारणांवरून छळ सुरू झाला.  

        तिला आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्या मरणास कारणीभूत झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सौ. निकिता हिने राजगोळी येथील त्यांच्या घराजवळील मालकीच्या विहिरीत दिनांक २९ ते ३१ /१२/२०२३ दरम्यान आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबतची फिर्याद मयत निकिताचे वडील गजानन पाटील यांनी चंदगड पोलीस ठाण्यात दिली असून वरील ५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर हनमंत नाईक व सहकारी करत आहेत.

No comments:

Post a Comment