आजच्या पिढीने कै. न. भु. पाटील यांच्या कार्यापासून प्रेरणा व आदर्श घ्यायला हवा - प्रा. विक्रम पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2024

आजच्या पिढीने कै. न. भु. पाटील यांच्या कार्यापासून प्रेरणा व आदर्श घ्यायला हवा - प्रा. विक्रम पाटील

कै. न. भु.पाटील स्मृतीदिन कार्यक्रमात बोलताना प्रा. विक्रम पाटील. व्यासपीठावर मान्यवर.

चंदगड  / सी. एल. वृत्तसेवा

         "माजी आमदार कै. न. भु. पाटील यांनी पुरोगामी विचारांचा वारसा जोपासला होता. विज्ञान निष्ठ दृष्टिकोन स्वीकारून त्यांनी विधायक कार्याचा डोंगर उभा केला. जत्रा, यात्रा, मद्यपान या ऐवजी समाजाला आवश्यक असणाऱ्या ज्ञान मंदिराची निर्मिती केली. संपूर्ण गावाला श्रमदानाचा आदर्श घालून दिला तसेच गाव व्यसनमुक्त व्हावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. पिण्याचे पाणी शेतीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न यात जातीने लक्ष घातले. शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनीच सर्वप्रथम केला. दुर्दैवाने आजचा समाज गतानुगतिक बनत चालला असून विचारांचा वारसा हरवतो आहे की काय असे वाटत आहे. ही आत्मचिंतनाची वेळ असून समाजाने अंतर्मुख होऊन पुन्हा एकदा कै. न. भु. पाटील यांच्या कार्याचे स्मरण करून खऱ्या अर्थाने त्यांच्या मार्गाचे अनुसरण केले तरच त्यांना आदरांजली वाहिल्यासारखे होईल. असे प्रतिपादन दक्षिण महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांनी केले. ते शिवनगे (ता. चंदगड) येथील कै. न. भु. पाटील प्रतिष्ठान मार्फत घेण्यात आलेल्या  ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. बाळाराम पाटील हे अध्यक्ष होते.       

    अध्यक्ष स्थानावरून बोलताना बाळाराम पाटील यांनी ``बोलण्यापेक्षा कृतीतूनच आपण थोर व्यक्तींचे आदर्श जोपासले पाहिजेत असे सांगितले ,त्याचप्रमाणे कै. न. भु. पाटील यांच्याबरोबर ज्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले त्या मामासाहेब लाड, भाई दाजीबा देसाई, बहिर्जी शिरोळकर, दाजीबा सावंत, व्ही. एस. पाटील, शामराव देसाई या कार्यकर्त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. या कार्यक्रमात विद्यावादस्पती पदवी मिळाल्याबद्दल डॉ. प्रा. टी. एम. पाटील व प्रा. डॉ. एस. एन. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. टी. एम. पाटील व सानिया मुंगारे यांनी सत्काराला उत्तर म्हणून मनोगते व्यक्त केली.

        चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश मिळाल्याबद्दल प्रथमेश काणेकर यांचा ही सत्कार करण्यात आला. देशपातळीवर शास्त्रीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सानिया मुंगारे हिला गौरवण्यात आले. तसेच तालुक्यात दहावी व बारावीला प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना  पारितोषिक देण्यात आली. मागासवर्गीय मुलीत दहावीत प्रथम व बारावीला तालुक्यात मुलीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनींना नागूबाई माने यांच्या स्मरणार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. 

     यावेळी खेळाडू, शेतीमध्ये प्रयोग करणारे प्रयोगशील शेतकरी यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कै. न. भु. पाटील प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. एस. पी. बांदिवडेकर यांनी केले. या प्रास्ताविकातून त्यांनी त्यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. सूत्रसंचालन ए. डी. कांबळे व दीपक माने यांनी केले. ताम्रपर्णी विद्यालयाच्या विद्याथिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत स्वागत गीत सादर केले. बाळेशघोळ यांनी आभार मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ व अभ्यागत यांची प्रचंड संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment