तंबाखूचे व्यसन सर्वनाशास आमंत्रण - डॉ. अमोल पाटील, माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

16 January 2024

तंबाखूचे व्यसन सर्वनाशास आमंत्रण - डॉ. अमोल पाटील, माडखोलकर महाविद्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

       तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ आरोग्यास हानिकारक आहेत. त्यांची एकदा सवय लागली की माणूस त्यातून सहजासहजी सुटू शकत नाही. तंबाखूमुळे जिभेचा आणि मुखाचा कर्करोग होण्याचा संभव जास्त असतो. तंबाखू प्राणघातक आहे. त्यामुळे युवकांनी स्वतःपासूनच सुरुवात करावी आणि इतरांनाही व्यसनापासून परावृत्त करण्याचे काम करावे. येत्या काही दशकात भारत हा नुसता तरुणांचा देश नाही तर निरोगी व आरोग्य संपन्न तरुणांचा देश बनायला हवा असेल तर प्रत्येकाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन पूर्णतः टाळले पाहिजे. असे प्रतिपादन चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी केले. 

       ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. निकम होते. यावेळी डॉ. निकम यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना तंबाखू, गुटखा, मावा यामुळे कशाप्रकारे कौटुंबिक जीवनाला हानी पोहोचते हे सोदाहरण स्पष्ट केले. डॉ. निलेश पाटील (समन्वयक राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम) यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. स्नेहल मुसळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. एम. एम. माने यांनी या विधायक उपक्रमास शुभेच्छा दिल्या. 

         कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी रवी पाटील, वसंत गायकवाड, क्रांती शिंदे यांनी विशेष सहकार्य केले.चारुशीला कणसे यांनी सर्वांना तंबाखूमुक्त जीवन जगण्यासाठी शपथ दिली. यावेळी प्रबोधनासाठी पोस्टर्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस उत्तम प्रतिसाद लाभला. रवी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. आर. ए. कमलाकर, डॉ. ए. पी. पाटील यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment