चंदगड तालुक्यातील एक शिक्षकी शाळा ठरली जिल्ह्याला भारी...! प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2024

चंदगड तालुक्यातील एक शिक्षकी शाळा ठरली जिल्ह्याला भारी...! प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
         जिल्हा परिषद कोल्हापूर (शिक्षण विभाग प्राथमिक) मार्फत घेण्यात आलेल्या 'विज्ञान प्रदर्शन २०२३-२४' अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेत चंदगड तालुक्यातील शिरोली शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. २२ इतक्या छोट्या पटाच्या एक शिक्षकी शाळेत सौ. सरिता बाळाराम नाईक या गेली ५ वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची तालुक्यात ओळख असून त्यांना यंदा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. 
        चंदगड तालुक्यातील दुर्गम भागातील या शाळेने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर जिल्हास्तरावर सर्व १२ तालुक्यातून आलेल्या प्रथम क्रमांकाच्या संघांना निर्विवादपणे मागे टाकत बौद्धिक स्पर्धेत मिळवलेले निर्भेळ यश अभिनंदनास पात्र आहे. अंतिम स्पर्धेत शिरोली शाळेच्या इयत्ता पहिली ते पाचवीतील स्वरा बाळाराम नाईक, वेदिका वासुदेव नलवडे, आर्या संजय देसाई या तीन विद्यार्थिनींनी चंदगड तालुक्याचे प्रतिनिधित्व करत अजिंक्यपद पटकावले. विशेष म्हणजे गेली सलग चार वर्षे चंदगड तालुक्यात या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला होता. तर जिल्हास्तरावर एकदा तिसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. मार्गदर्शक शिक्षिका सरिता नाईक या प्राथमिक शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गटाच्या प्रसिद्धी प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व शैक्षणिक क्षेत्रातून विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.


No comments:

Post a Comment