पारगड येथे झालेल्या ढाला उत्सवात पारंपारीक गीते म्हणत सहभागी झालेल्या महिला
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
दूरदेशी राहणाऱ्या लेकी, सुनांच्या उपस्थितीत पारंपरिक 'ढाला' उत्सवाची उद्या दि. २५/०१/२०२४ रोजी सांगता होणार आहे. तंटामुक्त कमिटी पारगड, नामखोल, मिरवेल चे अध्यक्ष रघुवीर खंडोजी शेलार यांनी गावातील वयोवृद्ध श्रीमती इंदिराबाई विष्णुपंत झेंडे यांच्या माध्यमातून "लेकिंनु, सुनांनु, नातींनु जो कोणी पूर्वजांनी ढालो घातलो, तो आज पर्यंत आमी चालयलूत हयसून पुढे तुमका चालांग व्हया, यया बेगिना आणि गजबजून ढालो घाला...!" आपल्या बोलीभाषेतून घातलेल्या या हाकेला प्रतिसाद देत गडावरील उपस्थिती वाढली आहे.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील जंगल परिसरातील गावांत वनदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी पौष महिन्यातील शुद्ध नवमी ते पौर्णिमे पर्यंत आठ-दहा दिवस हा उत्सव चालतो. रोज रात्री वनदेवतेचे पूजन व तिला प्रसन्न करून घेण्यासाठी महिला पारंपारिक गीतांसह फेर धरून नृत्य करतात. यावेळी काही मुले व महिला वन्य प्राणी तर काही महिला शिकारी बनून शिकारीचा खेळ खेळतात. देवीला नैवेद्य दाखवला जातो, अखेरच्या दिवशी गावातील सर्व महिला एकत्र येत सर्वांसाठी जेवण बनवतात.
'ढाला' हा शेकडो वर्षांपासून चालत आलेला पारंपरिक उत्सव जंगल-संस्कृती संवर्धनतील एक अविभाज्य भाग आहे. आधुनिक जीवनशैलीत लोप पावत चाललेल्या अशा उत्सवांचे जतन करण्यासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न झाले पाहिजे. सांगता समारंभास तालुक्यातील वन विभाग तसेच इतर विभागातील अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून गडावरील किंबहुना जंगल परिसरातील रहिवाशांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार व ग्रामस्थांनी केले आहे.
No comments:
Post a Comment