फुटीरांच्या शिवसेनेला खरी ठरवत लोकशाहीचा मुडदा पाडणारा निकाल...! लक्ष्मण मनवाडकर, निर्णयाविरोधात चंदगड तालुक्यात शिवसैनिकांची संतप्त निदर्शने - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2024

फुटीरांच्या शिवसेनेला खरी ठरवत लोकशाहीचा मुडदा पाडणारा निकाल...! लक्ष्मण मनवाडकर, निर्णयाविरोधात चंदगड तालुक्यात शिवसैनिकांची संतप्त निदर्शने

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता संबंधी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या विरोधात दिलेल्या निकालाच्या विरोधात राज्यभर तीव्र पडसाद उमटले. चंदगड तालुक्यातही उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने ठिकठिकाणी संतप्त निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला.

     चंदगड येथे तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर व अनिल दळवी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी महाराज चौकात तीव्र निदर्शने व राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना तालुकाप्रमुख मनवाडकर म्हणाले असंविधानिक पद्धतीने पदावर बसलेल्या नार्वेकर यांनी भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचून लोकशाहीचा मुडदा पाडला. गद्दार व फुटीरांच्या शिवसेनेला खरी ठरवत न्यायव्यवस्थेशीही खिलवाड केला आहे असा हल्लाबोल केला. 

       अशा प्रकारामुळे जनतेचा लोकशाही वरचा विश्वास उडाल्याचे सांगून नार्वेकर सारखा घरगडी असा काहीतरी फडतूस निर्णय देणार याची महाराष्ट्रातील नागरिकांना आधीच कुणकुण लागली होती. आता आपण जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागू असे स्पष्ट केले. तालुकाप्रमुख अनिल दळवी यांनी भाजपची चापलुशी करण्यासाठीच राहुल नार्वेकरला त्या पदावर बसवले होते. या निर्णयामुळे महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभिमान दिल्ली श्वरांच्या पायदळी गहाण ठेवला आहे. अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन महाराष्ट्रातील सुज्ञ मतदारांनी याचा बदला घ्यावा असे आवाहन केले. 

        यावेळी युवा सेना प्रमुख विक्रम मुतकेकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शांता जाधव, माजी तालुकाप्रमुख महादेव गावडे आदींची भाषणे झाली. यावेळी नार्वेकर यांच्या फोटोला चप्पलने मारहाण करून शिवसैनिकांनी आपला राग व्यक्त केला. यावेळी उपतालुका प्रमुख विनोद पाटील, अवधूत भुजबळ, संतोष पाटील, मोनाप्पा चौगुले, शिवप्रसाद अंगडी, अनिरुद्ध कुट्रे, बाळू पेडणेकर, चंद्रकांत शिवनगेकर, महादेव गुरव, यल्लाप्पा मुतकेकर, अवधूत भुजबळ, नितीन सुतार, निवृत्ती गावडे, एकनाथ वाके, मोनाप्पा चौगुले, बाबू चौगुले, हनुमंत भोंगाळे, वाकोबा कदम, पुरुषोत्तम रेडेकर, उदय मंडलिक, परशराम मुरकुटे, प्रकाश नाईक, शिवाजी तळवार, आनंद पाटील, बाळू पेडणेकर, निळकंठ गावडे, भाग्यश्री पाटील, रेखा पाटील, गुलाबी शिंदे, मधुरा कांबळे आदींसह शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

No comments:

Post a Comment