सुभेदार रायबा मालुसरे |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
स्वराज्यातील अजिंक्य किल्ला पारगड वर गडाचे पहिले किल्लेदार सुभेदार रायाजी उर्फ रायबा तानाजी मालुसरे यांच्या जगातील पहिल्या स्मारकाचे लोकार्पण रविवार दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
४ फेब्रुवारी १६७० मध्ये सिंहगडाच्या लढाईत तानाजी मालुसरे शहीद झाल्यानंतर छत्रपती शिवरायांनी दक्षिणेच्या मोहिमेवर असताना या गडाची निर्मिती केली. रायबा यांना किल्लेदार नेमून किल्ला त्यांच्या ताब्यात दिला. असा इतिहास आहे. सन १६७४ नंतर तब्बल ६० वर्षे पारगड वर वास्तव्य करून सिंधुदुर्ग व छत्रपतींनी स्थापन केलेल्या अरबी समुद्रातील आरमाराला रसद पुरवण्याचे काम रायाजी यांनी केले. सोबतच गोव्यातील पोर्तुगीज, इंग्रज व कर्नाटक प्रांतावर वचक ठेवला. त्यांच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी रायाजी यांचे यथोचित स्मारक व पुतळा पारगड वर उभारण्याचा संकल्प दुर्गप्रेमी, शिवभक्त व मालुसरे कुटुंबीयांनी पूर्ण केला आहे.
स्मारकासाठी मालुसरे कुटुंबीयांनी आपली जमीन उपलब्ध करून दिली असून स्मारकाची व्याप्ती वाढवून येथे ऐतिहासिक वस्तूसंग्रह व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. गडावर येणाऱ्या पर्यटक व शिवभक्तांसाठी हे स्मारक माहिती स्रोत व प्रेरणास्थान ठरणार आहे. लोकार्पण सोहळ्यास नरवीर तानाजी व सूर्याजी मालुसरे बंधू यांचे पारगड, उमरठ, पोलादपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगावसह देशाच्या कानाकोपऱ्यात वास्तव्य करणारे वंशज, गडावरील व शिवरायांच्या स्वराज्य उभारणीत योगदान दिलेल्या मावळे व सरदार घराण्यांचे महाराष्ट्रातील वंशज यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते अखलाक मुजावर, महागाव (ता. गडहिंग्लज) यांचे शिवचरित्रावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले असून आपण उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन मालुसरे परिवार व दुर्गप्रेमींनी केले आहे.
No comments:
Post a Comment