'दौलत'च्या चिमणीतून निघणाऱ्या राखेमुळे कारखाना परिसर प्रदूषणाच्या विळख्यात...! परिसरातील महिलांची प्रदूषण महामंडळाकडे तक्रार - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2024

'दौलत'च्या चिमणीतून निघणाऱ्या राखेमुळे कारखाना परिसर प्रदूषणाच्या विळख्यात...! परिसरातील महिलांची प्रदूषण महामंडळाकडे तक्रार

 

दौलत कारखान्याच्या चिमणीतून निघणाऱ्या धुरामुळे होत असलेले प्रदूषण रोखण्याच्या मागणीचे निवेदन कारखाना व्यवस्थापनाला देताना परिसरातील महिला.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड तालुक्यातील दौलत तथा अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या चिमणीतून उडणारी राख हवेतून पसरून होत असलेल्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कारखान्यातून कारखान्याच्या माध्यमातून होणारे प्रदूषण तात्काळ रोखून कारवाई करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ, महिलांनी प्रदूषण महामंडळ उद्योग भवन कोल्हापूर, प्रदूषण मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिप. कोल्हापूर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

      दौलत कारखाना सुरू असलेल्या कलावधीत कारखान्याच्या चिमणीतून उडणारी राख ही हवेतून बाहेर पसरत आहे. सदर राख पिण्याच्या पाण्यात, नागरिकांच्या  डोळ्यांत, परिसरातील कौलारू घरांच्या कौलातून आत येत आहे. या राखेमुळे बाहेर कपडे सुकत घालण्याची ही सोय राहिलेली नाही. यामुळे आजूबाजूच्या ग्रामस्थांमध्ये दमा, टीबी, फुफुसाचे व श्वसन रोग, डोळ्यांचे आजार कमालीचे वाढले आहेत. याचा शेती पिकांवरही विपरीत परिणाम होत असून आंबा, काजू व इतर फळझाडे, पालेभाज्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असून उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. सर्वच दृष्टीने या राखेचा व प्रदूषणाचा परिसरातील गावातील नागरिकांना त्रास होत असून आगामी काळात हा त्रास वाढत जाणार आहे. तरी या प्रदूषणाची दखल घेऊन यावर योग्य ती कारवाई करावी व प्रदूषण थांबवावे, अशी मागणी करण्यात आली असून याबाबत तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत कारखाना व्यवस्थापनालाही देण्यात आली आहे.

       निवेदनावर पुष्पा तुकाराम नाईक, प्रतिमा परशराम भेंडुलकर, सुरेखा गोपाळ गडकरी, संगीता शंकर भोसले, लता प्रकाश सुतार, सरस्वती मारुती पाटील, जिजाबाई तुकाराम कोकितकर, सुमन भागोजी शिवणगेकर आदींच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment