कर्यात भागातील कडधान्य पिके फायदेशीर, उसावरील वाढत्या खर्चामुळे शेतकरी पुन्हा पारंपरिक पिकांकडे - चंदगड लाईव्ह न्युज

02 February 2024

कर्यात भागातील कडधान्य पिके फायदेशीर, उसावरील वाढत्या खर्चामुळे शेतकरी पुन्हा पारंपरिक पिकांकडे

कालकुंद्री/ कुदनूर शिवारातील मसूर, वाटाणा पिकाचे छायाचित्र

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 
    पाण्याच्या विपुलतेमुळे ऊस पिकाखालील वाढते क्षेत्र व अनियमित हवामानामुळे चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागातील वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या मसूर, वाटाणा आदी कडधान्य पिकाखालील क्षेत्र व उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. तथापि यंदा इंद्रायणी सारख्या भाताला मिळालेला विक्रमी दर व अनियमित हवामानातही बऱ्यापैकी टिकून असलेली जोमदार कडधान्य पिके यामुळे मसूर उत्पादक शेतकरी सुखावला आहे. उसावरील वाढत्या खर्चाचा विचार करता 'पारंपरिक भात व कडपाल पिकेच बरी' या मानसिकतेत शेतकरी दिसत आहेत.
    कर्यात भागातील कडलगे बुद्रुक पासून पूर्वेकडील नागरदळे, किणी, कागणी, कालकुंद्री, कुदनूर, कोवाड, निट्टूर दुंडगे, म्हाळेवाडी, घुल्लेवाडी, राजगोळी बुद्रुक पर्यंत १५-२० गावांच्या शिवारात भात कापणीनंतर ऑक्टोबर महिन्यात जमिनीतील ओलाव्यात मसूर, वाटाणा, मोहरी, गहू, हरभरा अशी रब्बी पिकांची पेरणी केली जाते. केवळ अडीच महिन्यात येणाऱ्या या पिकांना पाणी, खतांची मात्रा, भांगलण असा कोणताच खर्च नसल्याने ही पिके शेतकऱ्यांसाठी बोनस ठरतात. भाताबरोबरच मिळणाऱ्या पिंजर वैरणीलाही सोन्याचा भाव आला आहे. येथील मसुरीला २५० रुपये किलो म्हणजे २५ हजार रुपये क्विंटल दर असून मळणी नंतर मिळणारा कोंडा (व्हाट) पशुधनासाठी पौष्टिक खाद्य म्हणून उपयोगात येतो. 
     या उलट ऊस पिकासाठी पाण्याची चौथाई- पाचवाई, महागडी खते, औषधे, अंतर मशागत, ऊस तोडणी, वाहतूकदारांकडून होणारी पिळवणूक, कारखान्यांचे संशयास्पद वजन काटे याचा विचार करता उत्पादन खर्च व फायद्याच्या तुलनेत ऊस पिकापेक्षा भात व कडधान्य पिके घेणे परवडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी येथील शेतकरी पुन्हा पारंपरिक भात शेती व फायदेशीर असलेली कडधान्य पिके घेण्याच्या मानसिकतेत दिसत आहे.
    यंदा अनियमित हवामान अधून मधून आलेल्या अवकाळी पावसातही इकडील रब्बी हंगामातील कडधान्य पिकांतून बऱ्यापैकी लाभाची शाश्वती असल्यामुळे ज्यांनी ही पिके घेतली आहेत असे शेतकरी उत्साहीत असल्याचे दिसत आहे.

No comments:

Post a Comment