चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
विद्यार्थी जीवनात निश्चित ध्येय आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी जीवनाचा राजमार्ग शोधून यशाची अनेक शिखरे पदाक्रांत करता येतात, असे प्रतिपादन चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले. ते माडखोलकर महाविद्यालय, चंदगडच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी मजरे शिरगाव येथे बोलत होते.
श्री. चव्हाण पुढे, "की विद्यार्थी हा एक मातीचा गोळा आहे त्याला आकार देण्याचे कार्य गुरुजन वर्ग, आई-वडील व समाजातील विभिन्न घटक करत असतात. आपण समाजाचे देणे लागतो. या ऋणातून मुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपणे व श्रमाची प्रतिष्ठा वाढवावी. मानवी जीवन समृद्ध घडविणारी ही योजना आहे. यामधून आपल्याला नेतृत्व कौशल्य, श्रमप्रतिष्ठा, वाईट गोष्टीचा त्याग, बांधिलकी, सेवाभाव, वेळेचे योग्य नियोजन, सुसंगती, समाजभान, व्यक्तिमत्व विकास, वैचारिक प्रगल्भता अशा असंख्य गोष्टी शिकता येतात. यासाठी आपण एन.एस.एस. शिबिरात सहभागी होणे गरजेचे असते. आपण सर्व स्वयंसेवक भाग्यवान आहात."
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एम. माने होते. ते म्हणाले विद्यार्थी केवळ पुस्तकी कीडा न बनता त्याला सर्व गुण संपन्न बनावयाचे असेल तर राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये व विविध ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होणे जरुरीचे असते. तुम्ही या गावाशी स्नेहबंध जोडण्यासाठी आठ दिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या हिताची अनेक कामे केलात, त्यांचे प्रबोधन केलात व सारा गाव बदलून टाकला यातच खरे शिबिराचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. आपण स्वयंसेवक म्हणून यामधून शिकलेल्या सर्व चांगल्या गोष्टींचे यापुढे अनुकरण करत राहावे असा मोलाचा संदेश त्यांनी युवकांना दिला."
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर्व स्वयंसेवकांना मतदार जनजागृतीची शपथ देण्यात आली व उपस्थित ग्रामस्थ व युवकांमध्ये मतदान व मतदारांच्या हक्काविषयी जाणीव जागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे प्रकल्प अधिकारी व कोल्हापूर जिल्हा समन्वयक डाॅ. संजय पाटील यांनी करून व सात दिवसांमध्ये शिबिरात राबविलेल्या उपक्रमांचा धावता आढावा घेतला. ग्रामस्थ व शिबिरार्थीनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व आभार मानले. डॉ ए. पी. पाटील व कुमारी गावडे यांनी मनोगते व्यक्त केली या कार्यक्रमासाठी गावचे उपसरपंच मोहन कुंदेकर, विलास वाके, दिलीप सूर्यवंशी, डॉ एन एस मासाळ, डॉ एन. के. पाटील, प्रा आर. एस. पाटील, डॉ आर. ए. कमलाकर, डॉ के. एन. निकम, प्रा. बी. एम. पाटील, डॉ ए वाय जाधव, शिवराज हसुरे श्रीपाद सामंत, महेश सामंत, प्रतिष्ठित नागरिक, स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. ए.डी. कांबळे यांनी केले व आभार डॉ. एस. डी. गावडे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment