चंदगड / प्रतिनिधी
कायदा सर्वांसाठी समान आहे. मात्र कायद्यातील बदल समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक गुन्ह्यासाठी कायदा वेगळा आहे. कायदा म्हणजे जगण्याचे भान आणून देणारा महत्त्वाचा घटक आहे. न्यायव्यवस्था - समाजव्यवस्था आणि मानवी जीवन यामध्ये कायदा खूप महत्त्वाचा आहे. नकळत होणाऱ्या चुका आयुष्य उध्वस्त करायला कारणीभूत ठरतात. याचे भान ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाला महत्त्व द्यावे. असे प्रतिपादन ॲड. दिग्विजय कुराडे यांनी व्यक्त केले.
ते हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि अँटी रँगिग कमिटी यांचे मार्फत आयोजित "स्वसंरक्षण आणि कायदे "या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोपाळराव पाटील होते. प्रारंभी मान्यवर पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. एन. खरुजकर यांनी केले. कायदा आणि कायद्याच्या अनुषंगाने अनेक विविध पूरक माहिती ॲड.कुराडे यांनी सांगितली. विद्यार्थ्यांनीही यावेळी त्यांच्याशी संवाद साधला.
अध्यक्ष गोपाळराव पाटील म्हणाले ," कायदा हा समजून घेऊन प्रत्येकाने वागले पाहिजे. जीवनाची सार्थकता सर्वांगीण ज्ञानाने होते. कायद्याबरोबरच समाजाचे आणि शिक्षणाचे ज्ञान संपादित करा." कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. आभार डॉ. ए. पी. गवळी यांनी मानले.
No comments:
Post a Comment