ध्येयासाठी सामर्थ्यवान बना - प्राचार्य डॉ सावंत, हलकर्णी महाविद्यालयात तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना निरोप - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2024

ध्येयासाठी सामर्थ्यवान बना - प्राचार्य डॉ सावंत, हलकर्णी महाविद्यालयात तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना निरोप

  


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

        'विविध कौशल्ये आत्मसात करा. तुमच्या कौशल्याची आज समाजाला गरज आहे.  समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे. नोकरी घेणारा नाही तर नोकरी देणारा आपण बनलं पाहिजेत. स्वतःचं चिंतन करा म्हणजे चांगल्या संधी निर्माण होतील .समाजासाठी आपण चांगला घटक बनू शकतो. सर्वप्रथम स्वतःमध्ये बदल करा म्हणजे समाज बदलेल. महाविद्यालयाचा नावलौकिक वाढेल यासाठी चांगले काम करा पदवी गुणधर्म आत्मसाद करा. स्वतःमध्ये सामर्थ्य तयार करा म्हणजे ध्येय गाठता येईल' असे मत महागाव येथील संत गजानन महाराज कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांनी व्यक्त केले. ते हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित तृतीय वर्ष विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. बीकॉम बीएससी बीए भाग तीनच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक  गोपाळराव पाटील उपस्थित होते. 

       कार्यक्रमासाठी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. यु. एस. पाटील यांनी केले. प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांचा सन्मान गोपाळराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 

    या निरोप समारंभ प्रसंगी अनिश कांबळे, इंद्रायणी पाटील, भारती परीट, हर्षद कांबळे, गायत्री नेसरकर आदी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर मराठी विभाग प्रमुख डॉ अनिल गवळी यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. हर्षद कांबळे, साहिल कांबळे, ऐश्वर्या पाटील, निकिता खोत, करुणा तानगावडे, राधिका बसरीकट्टी,ज्योती पेडणेकर,निलम पाटील, अनुराधा पाटील, अनिकेत सुतार आदी विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

'विविध क्षेत्रात आपले विद्यार्थी चमकत आहेत हे पाहून समाधान वाटते. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानुन संस्थेची वाटचाल. ध्येय समोर ठेवून वाटचाल करा चांगला अभ्यास करून धाडसाने परीक्षेला सामोरे जा. आई-वडिलांचे कष्ट सार्थकी लावा. जीवन ही एक परीक्षा आहे ज्याला अभ्यासक्रम नसतो ते यशस्वी करण्यासाठी गुरूंनी दिलेले धडे आयुष्यात कायम ठेवा. त्यासाठी न थांबता हारता न थकता प्रयत्नवादी व्हा . कारण आज प्रयत्नवादी होणे गरजेचे आहे. आशावादी निराशावादी न होता प्रयत्नवादी व्हा देशाचा उत्तम नागरिक म्हणून घडण्याचा प्रयत्न करा व जीवन समृद्ध करा.' असे विचार अध्यक्षीय मनोगतात बोलताना गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा पी ए बोभाटे यांनी तर आभार डॉ मधुकर जाधव यांनी मानले.

No comments:

Post a Comment