राजगोळी खुर्द येथे शिवजयंती निमित्त छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करताना मान्यवर. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
देशात सध्या पर्यटन उद्योग वाढला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक ऐतिहासिक किल्ले, स्मारकांना मोठ्या प्रमाणात भेटी देत आहेत. तथापि अशा ठिकाणी काही उपद्रवी पर्यटक ऐतिहासिक ठेव्यांची नासधूस करणे, दारू पिणे, हुल्लडबाजी करणे असे प्रकार करताना दिसतात. यात तरुणांचा भरणा मोठा आहे. असे गैरप्रकार न करता पर्यटकांनी गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखावे. असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते अखलाक मुजावर यांनी केले ते राजगोळी खुर्द, ता चंदगड येथे शिवजयंती निमित्त व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी हिंदवी स्वराज्य मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल वाडकर हे होते.
राजगोळी खुर्द येथे शिवजयंती उत्सव मंडळाच्या रंगमंचाची उद्घाटन करताना चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील सोबत मान्यवर |
कार्यक्रमापूर्वी शालेय विद्यार्थ्यांनी शिवछत्रपतींच्या इतिहासावर आधारित गीते व नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्टेज चे उद्घाटन चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील (पत्रकार दैनिक पुढारी) यांनी केले. यावेळी पुढे बोलताना मुजावर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले स्वराज्यातील साडेतीनशे पेक्षा अधिक गड किल्ले ही त्यांची जिवंत स्मारके आहेत. त्यांचे संवर्धन म्हणजेच इतिहासाचे संवर्धन जतन असून शासनाने अशा दुर्लक्षित गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अनुदान देऊन त्यांची दगडूजी करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी स्त्रीभ्रूणहत्या या ज्वलंत प्रश्नावर आपले मत मांडताना प्रत्येक घरात एक तरी मुलगी असेल तरच त्या घराला खरे घरपण येते. असे सांगून 'बेटी बचाव, बेटी पढाव' चा पुरस्कार केला. शिवचरित्रावर आधारित चांगल्या पुस्तकांचे वाचन सर्वांनी केले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भावकु गुरव, श्रीकांत पाटील, माजी सैनिक केरबा पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास माजी सैनिक चंद्रकांत भोसले, शैलाप्पा साखरे, वैभव खोडवे, शंकर सांबरेकर, डेप्युटी सरपंच कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसवाणी कदम, मोहसीन मंगसुळी, मारुती कळसाई, नागोजी कदम, डेप्युटी सरपंच कांबळे आदींनी परिश्रम घेतले. मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल राजगोळी खुर्द हायस्कूल चे मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचाऱ्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment