पारगड वरील स्मारक स्थळी बसवण्यात येणारा सुभेदार रायबा मालुसरे यांचा पुतळा
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
स्वराज्यातील अजिंक्य किल्ला पारगड वर गडाचे पहिले किल्लेदार सुभेदार रायाजी उर्फ रायबा तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाचे लोकार्पण रविवार दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. रायबा यांचे हे देशातील पहिलेच स्मारक ठरणार आहे.
"आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत गड राखा..!" हा छत्रपती शिवरायांचा आदेश शिरसावंद्य मानून पाचशे मावळ्यांसह स्वराज्यातील हा किल्ला अभेद्य ठेवण्याची कामगिरी रायबा मालुसरे यांनी पार पाडली. ४ फेब्रुवारी १६७० मध्ये सिंहगडाच्या लढाईत तानाजी मालुसरे शहीद झाल्यानंतर छत्रपती शिवरायांनी दक्षिणेच्या मोहिमेवर असताना या गडाची निर्मिती केली. रायबा यांना किल्लेदार नेमून किल्ला त्यांच्या ताब्यात दिला, असा इतिहास आहे. सन १६७४ नंतर तब्बल ६० वर्षे पारगड वर वास्तव्य करून सिंधुदुर्ग व छत्रपतींनी स्थापन केलेल्या अरबी समुद्रातील आरमाराला रसद पुरवण्याचे काम रायाजी यांनी केले. सोबतच गोव्यातील पोर्तुगीज, इंग्रज व कर्नाटक प्रांतावर वचक ठेवला. त्यांच्या स्मृती चिरंतन जतन करण्यासाठी रायाजी यांचे यथोचित स्मारक व पुतळा पारगड वर उभारण्याचा संकल्प दुर्गप्रेमी, शिवभक्त व मालुसरे कुटुंबीयांनी केला. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी स्मारकाचे भूमिपूजन करून तीन महिन्यात पूर्णत्वाकडे नेला आहे.
निधी अभावी आर्थिक समस्येला तोंड देत जिद्दीने काम पूर्णत्वास नेण्याची धडपड मालुसरे कुटुंबीय व दुर्गप्रेमींकडून सुरू आहे. स्मारक स्थळी उभारण्यात येणाऱ्या रायबा मालुसरे यांच्या पुतळ्यासाठी ज्या चित्राचा वापर केला, त्याचे अनावरण नुकतेच सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारक स्थळी करण्यात आले. यावेळी तानाजी व सूर्याजी बंधू यांचे पारगड, उमरठ, पोलादपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगावसह देशाच्या कानाकोपऱ्यात वास्तव्य करणारे मालुसरे कुटुंबीय उपस्थित होते.
पारगड वरील स्मारकासाठी मालुसरे कुटुंबीयांनी आपली जमीन उपलब्ध करून दिली असून स्मारकाची व्याप्ती वाढवून येथे ऐतिहासिक वस्तूसंग्रह व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी अजून निधीची गरज असून इच्छुक देणगीदार सोबत दिलेल्या 'क्यू आर कोड' किंवा खाते नंबर वर आपली देणगी देऊ शकतात. किल्ले पारगडावर येणाऱ्या पर्यटक व शिवभक्तांसाठी हे स्मारक माहिती स्रोत व प्रेरणास्थान ठरणार आहे. २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सोहळ्यास उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार व्हावे, असे आवाहनही समस्त मालुसरे परिवार व दुर्गप्रेमी शिवभक्तांनी केले आहे.
No comments:
Post a Comment