चंदगड येथे स्वावलंबी दिव्यांग विधवा शेतकरी संस्थेमार्फत शिवजयंती साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2024

चंदगड येथे स्वावलंबी दिव्यांग विधवा शेतकरी संस्थेमार्फत शिवजयंती साजरी


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड येथे स्वावलंबी दिव्यांग विधवा शेतकरी संस्थे मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी रवळनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव सुरेश सातवणेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरपंचायतीचे प्रशासन अधिकारी आशुतोष प्रधान, चंदगड पोलीस ठाण्याच्या पी. एस. आय.  शितल धमीले, पत्रकार नंदकुमार ढेरे, अजय फाटक, विश्वास पाटील होते.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपतीं शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाहीर श्रीपती कांबळे व कुमारी शरण्या शेरेगार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला.

    प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष आशिष कुटीनो यांनी केले. यावेळी ते म्हणाले, ``छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांच्या कर्तुत्वातूनच आम्हाला प्रेरणा मिळाली आहे.

     मुठभर मावळ्यांना घेऊन त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. याच प्रमाणे आम्ही दिव्यांग विधवा बंधू भगिनींना एकत्र करून शासनाच्या वेगवेगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची काम ही संस्था करीत आहे. कोणतेही काम करीत असताना अडचणी ह्या येतातच त्यांना शिवाजी महाराजांनी कसे तोंड दिले. स्वराज्यावर महा संकट औरंगाजेबाने निर्माण केली. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान यांना मोठ्या फौजेने स्वराज्यावर स्वारीसाठी पाठवून दिले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तह करून २३ किल्ले परत दिले आणि औरंगजेबाच्या भेटीला दिल्लीला जाण्याची अट मान्य केली. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन गनिमी काव्याची साक्ष दिली. यातून संकटावर कसे मात करावे हे महाराजांच्या कडून शिकायला मिळते असे मत व्यक्त केले.

     सुरेश सातवणेकर अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणा एका जातीचे नव्हते. सर्व जातींना सामावून घेऊन स्वराज्याचा कारभार करीत होते. पर स्त्री चा सन्मानाने महिलांचा आदर करीत होते. त्यांच्या कार्याचा व कर्तुत्वाचा त्यांनी आढावा घेतला.

      यावेळी चंदगड नगरपंचायतीचे प्रशासन अधिकारी आशुतोष प्रधान. पी. एस. आय. शितल धबीले, नंदकुमार ढेरे यांनीही मनोगत व्यक्त केली. सुत्रसंचालन ॲड. अमृता शेरेगार यांनी केले. तर आभार नंदकुमार ढेरे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य दिव्यांग बंधू , भगिनी उपस्थित होत्या.


No comments:

Post a Comment