शिवचरित्रातून जिंकण्याची प्रेरणा मिळते - रवींद्र खैरे, राहुल कोडेकर व इंद्रायणी पाटील आदर्श विद्यार्थी, हलकर्णी महाविद्यालयात पारितोषिक वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2024

शिवचरित्रातून जिंकण्याची प्रेरणा मिळते - रवींद्र खैरे, राहुल कोडेकर व इंद्रायणी पाटील आदर्श विद्यार्थी, हलकर्णी महाविद्यालयात पारितोषिक वितरण

 


चंदगड / प्रतिनिधी 

      दिशाहीन झालेल्या समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांचे तंत्र आवश्यक आहे.  या देशाचा इतिहास खूप मोठा आहे तो वाचा त्यातून खूप काही शिकता येते. समाजात नाचणारी नाही तर वाचणारी पिढी निर्माण झाली पाहिजे. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे त्यामुळे स्वतःची कौशल्य सिद्ध करा. जिंकण्याची कला आपणास छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्राप्त होते. परिस्थितीची जाणीव झाल्याशिवाय जिंकता येत नाही. यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या आई वडील यांच्याकडे बघा त्यांचे हाल बघा म्हणजे परिस्थितीची जाणीव होऊन आपण पेटून उठाल. परिस्थितीची जाणीव झालेली माणसेच पेटून उठतात. स्वतःच्या पायावरती उभे राहण्याचा प्रयत्न करा कारण स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतःच घडवायचे आहे. वेगवेगळ्या काळात जगण्याची कौशल्ये महत्त्वाची होती.शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते कारण युक्तीच आपल्याला स्पर्धेत टिकवते. जगण समृद्ध करण्यासाठी महामानवांचे विचार आत्मसात करा. जिंकायच असेल तर थांबू नका. जिंकण्याची प्रेरणा आपल्याला शिवचरित्रातून मिळते. ' असे प्रतिपादन कोल्हापूर येथील करियर इन्स्टिट्यूट चे चेअरमन रवींद्र खैरे यांनी केले. ते हलकर्णी (ता. चंदगड)  येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थी गुणगौरव पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे  मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते. 

       प्रास्ताविक स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. यु एस पाटील यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन  करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलन समारंभात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी व्यासपीठावर दौलत विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव,उपाध्यक्ष संजय पाटील,सचिव विशाल पाटील कार्यकारी संचालक मनोहर होसुरकर, दौलत चे संचालक वसंत निकम बाबुराव गावडे मल्लिकार्जुन मुगेरी प्राचार्य डॉ. बी डी अजळकर,उपप्राचार्य प्रा एच के गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.  

      अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय गोपाळराव पाटील म्हणाले, 'कलागुणांना वाव देण्यासाठी हे व्यासपीठ आहे तसेच खेळ आपल्याला जिंकण्याची गंमत आणि हार पचवण्याची किंमत सांगत असतो.  आयुष्य चांगले बनवा आचार विचार आणि उच्चार यातून चांगला माणूस घडतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. सांघिकपणे विकासासाठी एकत्र या म्हणजे विकास होईल.' 

        महाविद्यालयाच्या वार्षिक कामगिरीचा आढावा प्राचार्य डॉ बी डी अजळकर यांनी अहवाल वाचनातून घेतला. सन २०२३- २४ मध्ये विविध क्रीडा स्पर्धेत तसेच वर्गात  प्राविण्य मिळवलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. वर्गात प्रथम आलेल्या पायल चौकुळकर (कुर्तनवाडी),योगिता कांबळे,अभिषेक कांबळे,सोनाली गडकरी,ऋतुजा पाटील,सोनाली पाटील,गायत्री नेसरकर, मल्लवा हजगुळकर,भारती परीट,कोमल होणगेकर, सोनाली केरकर यां विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. 

      यावेळी बी कॉम भाग ३ या वर्गाला आदर्श शैक्षणिक वर्ग म्हणून गौरविण्यात आले. यावर्षीचा आदर्श विद्यार्थी म्हणून रोहित राहुल कोडेकर (बीएससी 3 ) यांना आदर्श विद्यार्थिनी म्हणून कुमारी इंद्रायणी लक्ष्मण पाटील (बीकॉम 3 ) हिला सन्मानित करण्यात आले. 

       रमेश अर्जुनवाडकर (बीएस्सी I )  निकिता गावडे ( बीए I ) स्वाती उंबळकर (बी कॉम ॥ ) यांना जनरल चॅम्पियन तर कनिष्ठ विभागात रोहन गावडे ( 12 विज्ञान ) स्नेहल भोवडा (11 वाणिज्य ) जान्हवी जगताप समर्थ कुंभार (12 वि) यांना जनरल चॅम्पियन पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच विविध क्रीडा प्रकारात यश मिळवलेले विद्यार्थी बजरंग बिर्जे विक्रम पाटील नामदेव पाटील सुजाता भादवनकर स्वरांजली ढेकोळकर प्रदीप कांबळे दीक्षा जाधव सोनाली पाटील नीलम पाटील नकुशा पाटील सुनील सदावर यांना गौरविण्यात आले. 

         महाविद्यालयात सलग तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ३१ जानेवारी रोजी ध्वजारोहण  अध्यक्ष अशोक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. फनी गेम्स चे उद्घाटन उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केले. पाककृती स्पर्धेचे उद्घाटन सौ शितल विशाल पाटील आणि सौ लता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पारंपारिक वेशभूषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दुसऱ्या दिवशी सकाळी फुडस्टॉलचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन दौलत चे संचालक उत्तम पाटील, शिवाजी तुपारे,जगन्नाथ इंगवले,बाबुराव शिंदे,वसंत निकम,तुकाराम पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

      तर रांगोळी  स्पर्धेचे संचालक अशोक पाटील शिवाजी हसबे मारुती पुंडलिक पाटील बाबुराव शिंदे उपाध्यक्ष संजय पाटील आदी मान्यवरांनी उदघाटन केले. विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन गोपाळराव पाटील उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील संचालक मंडळी आदीनी केले. प्रा सुनिल पाटील यांनी रेखाटलेल्या तैल चित्रांचे सर्वांनी कौतूक केले. त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी सकाळी शेलापागोटे कार्यक्रम संपन्न झाला याचे उद्घाटन प्राचार्य डॉ बी डी अजळकर यांनी केले. 

                या कार्यक्रमासाठी विविध पदाधिकारी मान्यवर मंडळी प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा पी ए बोभाटे यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा एच के गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment