कालकुंद्री येथील शेतकरी रमेश पाटील यांची आगीत भस्मसात झालेली गवत गंजी |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील शेतकरी रमेश यल्लुप्पा पाटील यांच्या गावालगत गुंडाडा परिसरातील गवत गंजीला आग लागून सुमारे ७० हजारापेक्षा अधिक चे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३.२० च्या सुमारास घडली. गंजीतील सुमारे ७-८ ट्रॉल्या भाताचे पिंजर व कराड जळून खाक झाले. रमेश पाटील यांनी जनावरांसाठी गेल्या दोन महिन्यात स्वतःच्या शेतातील व विकत घेतलेली वैरण साठवली होती. अजूनही काही वैरण आणून रचायचे होते तत्पूर्वीच ठेवलेला चारा भस्मसात झाला. यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पशुधनाला वर्षभर खायला काय द्यायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. शेतकरी वर्गातून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
उन्हाळ्यात वनव्यामुळे अशा गवत गंज्यांना आगी लागण्याच्या घटनांपासून धडा घेत रमेश यांनी गंजीच्या आसपासच्या जमिनीवरील गवत आधीच जाळून गंजी सुरक्षित केली होती. त्यामुळे दुसरीकडून आग पसरत येऊन लागण्याचा संभव नव्हता. त्यामुळे ही आग अज्ञात समाजकंटकाने हेतूपुरस्सर लावली असावी असा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान गाव पातळीवर शेतकरी वर्गातून अज्ञात संशयीताचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
No comments:
Post a Comment