पारगड- मोर्ले रस्त्याला स्टेट हायवेचा दर्जा, लवकरच कामाचा शुभारंभ...! आम‌. राजेश पाटील, पारगडचा पाणी प्रश्नही मार्गी, लवकरच मुबलक पाणी - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2024

पारगड- मोर्ले रस्त्याला स्टेट हायवेचा दर्जा, लवकरच कामाचा शुभारंभ...! आम‌. राजेश पाटील, पारगडचा पाणी प्रश्नही मार्गी, लवकरच मुबलक पाणी

पारगडच्या पुढे मोर्लेकडे जाणारा डांबरीकरणाच्या प्रतीक्षेतील हाच तो स्टेट हायवे.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा 

       पारगड- मोर्ले रस्ता कामाच्या पूर्ततेसाठी चंदगड व दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना पुन्हा आंदोलन करण्याची गरज भासणार नाही. कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री ना. दीपक केसरकर व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना रवींद्र चव्हाण यांच्यासोबत या कामाचा लवकरच शुभारंभ करणार आहोत. असे प्रतिपादन चंदगड चे आमदार राजेश पाटील यांनी केले. पारगड किल्ल्यावरील पारगडचे पहिले किल्लेदार 'सुभेदार रायबा तानाजीराव मालुसरे' यांच्या स्मारकाचे लोकार्पण प्रसंगी पाणी व रस्ता संदर्भातील नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

पारगड येथील कार्यक्रम प्रसंगी रस्ता व पाणी प्रश्नावर बोलताना आमदार राजेश पाटील

   बेळगाव, चंदगड, हेरे, किल्ले पारगड, मोर्ले, दोडामार्ग ते पणजी किंबहुना कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्याला जोडणाऱ्या राज्य मार्गापैकी पारगड ते मोरले हे ८ किमी अंतराचे काम रखडले आहे. गेल्या ३० वर्षात या रस्त्यासाठी ३३ वेळा आंदोलने झाली आहेत. या प्रश्नी २० फेब्रुवारी २०२४ रोजीही आमरण उपोषण झाले होते. याचा संदर्भ देत आमदार पाटील यांनी आता या रस्त्यासाठी नागरिकांना यापुढे उपोषण करण्याची गरज पडणार नाही; अशी निःसंदिग्ध ग्वाही यावेळी दिली. या रस्त्याला 'स्टेट हायवे' दर्जा मिळाला असून या रस्त्यात वनविभागाच्या जाणाऱ्या जमीनीच्या मोबदल्यात शाहूवाडी तालुक्यातील जमीन वन विभागाला देण्यात आली आहे. सर्व अडथळे बाजूला झाले असून लवकरच या मार्गाचा शुभारंभ होईल. पाणी प्रश्नावर बोलताना गडावर पाणी आणण्यासाठी तीन-चार ठिकाणी पाहणी केली. पण तेथील पाणी अपुरे पडण्याची शक्यता असल्यामुळे हे काम थांबले होते. पण त्यावरही तोडगा निघाला असून लवकरच गडावर मुबलक पाणी उपलब्ध होईल. त्यायोगे इकडे पर्यटकांचा ओघ वाढेल असे स्पष्ट केले. याशिवाय २०२२ च्या पावसाळ्यात गडावरील ऐतिहासिक भगवती- भवानी मंदिराच्या समोरील कठडा व दरड कोसळली आहे. मंदिराला धोका उत्पन्न होण्याची शक्यता गृहीत धरून तसेच ग्रामस्थ, पर्यटक व शिवभक्तांच्या मागणीनुसार मंदिरासमोर धक्का बांधकाम तसेच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून ३० लाख रुपये मंजूर केल्याची माहिती यावेळी आमदार पाटील यांनी दिली. यावेळी सरपंच तुकाराम सुतार, उपसरपंच देविदास गडकरी, कान्होबा माळवे, रघुवीर शेलार, सुनील मालुसरे, प्रकाश चिरमुरे, विठ्ठल शिंदे, धोंडीबा बेर्डे आदी ग्रामस्थ, सूर्याजी मालुसरे यांचे वंशज अनिल मालुसरे, शिवभक्त व पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती होती.

 पारगड- मोरले या पाच वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाची सुरुवात तात्काळ करावी. या मागणीसाठी चंदगड व दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग कार्यालयासमोर दि. २० फेब्रुवारी २०२४ पासून आमरण उपोषण सुरू केले होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप नेते व माजी आमदार राजन तेली यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालघर जिल्हा पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करून पंधरा दिवसात या रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन मंत्र्यांच्या वतीने आंदोलकांना देत मध्यस्थी केली होती. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवत आंदोलकांनी उपोषण स्थगित केले होते. त्यामुळे ना. रवींद्र चव्हाण, सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. दीपक केसरकर, चंदगडचे आमदार राजेश पाटील, राजन तेली या सर्वांनी समन्वयाने या प्रश्नी यंत्रणा कामाला लावावी व पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा. अशी मागणी कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हा तसेच गोवा राज्यातील नागरिक, वाहनधारक, प्रवासी वर्गातून होत आहे.



 

No comments:

Post a Comment