किटवाड धरणात बेळगावचा तरुण बुडाला......! रेस्क्यू टीमकडून शोधमोहीम सुरु - चंदगड लाईव्ह न्युज

13 March 2024

किटवाड धरणात बेळगावचा तरुण बुडाला......! रेस्क्यू टीमकडून शोधमोहीम सुरु

 

उजेब तन्वीर मुजावर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        किटवाड (ता. चंदगड) येथील लघु पाटबंधारे धरण क्रमांक १ मध्ये बेळगाव येथील तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज बुधवार दि. १३ रोजी दुपारनंतर ४ च्या सुमारास घडली. उजेब तनवीर मुजावर (वय १७, रा.  वैभवनगर बेळगाव) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. 

        याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, ``या सर्व विद्यार्थ्यांकडून धरणात अंघोळ करणे, सेल्फी काढणे असे प्रकार सुरू होते. यावेळी कालकुंद्री कडील बाजूस यातील उजेब नावाचा विद्यार्थी खोल पाण्यात बुडाला, तो पुन्हा वर आलाच नाही. सोबतच्या विद्यार्थ्यांनी उजेबला बाहेर काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सायंकाळी सात नंतर बेळगाव येथील पाणबुडे व रेस्क्यू टीम मार्फत त्याचा शोध सुरू होता. तथापि रात्री साडेनऊ वाजेपर्यंत बुडालेल्या विद्यार्थ्याचा शोध लागला नाही. 

          शोध मोहिमेत रेस्क्यू टीम सह नातेवाईक तसेच चंदगड पोलीस ठाणे अंतर्गत कोवाड पोलीस दुरुक्षेत्राचे हवालदार जमील मकानदार, पोलीस नाईक कुशाल शिंदे, होमगार्ड नितीन नाईक, बसू पाटील आदींनी सहभाग घेतला. पोलीस टीम या ठिकाणी लक्ष ठेवून आहे. गेल्या चार-पाच वर्षात या धरणात आठ ते दहा जणांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक वेळा सूचना देऊनही परिसराची माहिती नसलेने पर्यटक पाण्यामध्ये जाण्याचे धाडस करतात व जीव गमावतात. ग्रामपंचायत कालकुंद्री व किटवाड यांच्या वतीने येथे लावलेले इशारा फलक अज्ञातांकडून काढून टाकले जातात. पर्यटकांनी यापुढे तरी दक्षता घ्यावी असे आवाहन दोन्ही ग्रामपंचायती तसेच पोलिसांकडून करण्यात आले आहे. घटनेची नोंद करण्याचे काम पोलीसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

No comments:

Post a Comment