उजेब तन्वीर मुजावर (मयत) |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
किटवाड (ता. चंदगड) येथील लघु पाटबंधारे धरणात बेळगाव येथील तरुण काल बुधवार दि. १३ मार्च २०२४ रोजी दुपारी ४ च्या सुमारास बुडाला होता. सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत त्याचा बेळगाव येथील पाणबुडे व रेस्क्यू टीम मार्फत शोध घेतला पण यश आले नव्हते. आज गुरुवार सकाळी पुन्हा चंदगड व बेळगाव येथील पथकामार्फत शोध मोहीम सुरू करण्यात आली. त्याला ११ वाजता यश आले. बुडून मयत झालेल्या तरुणाचे नाव उजेब तनवीर मुजावर, वय १७, राहणार वैभवनगर बेळगाव असे असून घटनेची वर्दी मयताचा मामा वाशिम जुयेदखान पठाण, बेळगाव यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. मृतदेह ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे नेण्यात आला असून शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल.
याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, कर्नाटक राज्यातील इयत्ता दहावी (एसएसएलसी) परीक्षेचा काल शेवटचा पेपर होता. दुपारी पेपर संपवून १३-१४ विद्यार्थी परीक्षा व अभ्यासाचा शीण घालवण्यासाठी किटवाड धरण परिसरात आले होते. धरणात अंघोळ करताना कालकुंद्री कडील बाजूस यातील उजेब खोल पाण्यात बुडाला तो पुन्हा वर आलाच नाही. विद्यार्थ्यांनी आरडाओरड करत उजेबला बाहेर काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. रात्री १२ पर्यंत रेस्क्यू टीम सह नातेवाईक, ग्रामस्थ, कोवाड पोलीस दुरुक्षेत्राचे हवालदार जमील मकानदार, पोलीस नाईक कुशाल शिंदे, होमगार्ड नितीन नाईक, बसू पाटील आदींनी शोध मोहिमेत भाग घेतला होता. रात्री बेळगाव येथून आणलेले अत्याधुनिक कॅमेरे धरणाच्या पाण्यात सोडून मृतदेहाचा शोध घेण्यात आला होता. तथापि त्यालाही यश आले नव्हते.
धरण परिसरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत कालकुंद्री व किटवाड यांच्या वतीने विविध उपाय योजना केल्या जात असल्या तरी पर्यटकांनीच स्वतः सह कुटुंबीयांची सुरक्षितता बाळगणे हाच यावर पर्याय आहे.
No comments:
Post a Comment