![]() |
| वसंत पांडुरंग पाटील |
चंदगड / प्रतिनिधी
काजूबागेत गेलेला चंदगड तालुक्यातील हाजगोळी (ता. चंदगड) येथील वसंत पांडुरंग पाटील (वय ६५, रा. हाजगोळी) हा शेतकरी मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता होता. घटनास्थळी रक्ताचा सडा व त्याची दुचाकीही गायब झाल्याने त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. अखेर आज (शुक्रवार दि. २९ मार्च रोजी) त्यांचा मृतदेह तूर्केवाडी- जंगमहट्टी दरम्यानच्या हांजहोळ नदीच्या बंधाऱ्यात सापडला. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत असून लवकरच याबाबतचा खुलासा होईल असं चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी वसंत पाटील हे नेहमीप्रमाणे काजू राखण्यासाठी माडवळे-हाजगोळी रस्त्याला लागून असलेल्या आपल्या काजूच्या बागेत गेले होते. रात्री नऊ वाजेपर्यंत ते घरी न आल्याने पत्नी व नातेवाइकांनी त्यांचा शोध घेत बाग गाठली. त्यावेळी काजूबागेत दुचाकीसह तेही गायब होते. मात्र, घटनास्थळी पडलेला रक्ताचा सडा व वसंत यांचे पडलेले चप्पल यावरून कुणीतरी हल्ला करून त्यांना गायब केल्याच्या संशयावरून पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. अखेर आज तूर्केवाडी - जंगमहट्टी दरम्यानच्या बंधाऱ्यात त्यांचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान वसंत पाटील यांची दुचाकी अद्याप सापडली नसल्याने पोलीस यंत्रयंत्रणेने तपास कामात आपली गती वाढवली आहे.

No comments:
Post a Comment