चिंचणे येथे वाळू उत्खननाचे गढूळ पाणी थेट ताम्रपर्णी नदित, ग्रामस्थ व जनावारांचे जीवन धोक्यात - चंदगड लाईव्ह न्युज

29 March 2024

चिंचणे येथे वाळू उत्खननाचे गढूळ पाणी थेट ताम्रपर्णी नदित, ग्रामस्थ व जनावारांचे जीवन धोक्यात

चिंचणे येथे वाळू खाणीतील पाणी थेट ताम्रपर्णीत मिसळल्याने दूषित झालेले पाणी

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
       शासनाचे नियम धाब्यावर बसवत प्रचंड प्रमाणात उत्खनन होत असलेल्या चिंचणे येथील वाळू खाणीतील पाणी थेट ताम्रपर्णी नदिपात्रात सोडण्यात आल्याने जनावारांच्या व ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. हे पाणी  तात्काळ थांबवून संबंधीतावर कारवाई करण्याची  गरज निर्माण झाली आहे.
     चिंचणे येथे गेल्या अनेक वर्षापासून वाळू उत्खनन करण्यात येत आहे. वनविभाग व गायरान क्षेत्रानजिक अगदी चिंचणे गावशेजारी हे उत्खनन होत आहे. गावाशेजारी दिवसात्र होणाऱ्या उत्खननामुळे येथे मोठया प्रमाणात डंपर , जेसिबी , ट्रॅक्टर आदि वाहनांचा आवाजाने ग्रामस्य त्रस्त आहेत. तसेच धूळ व अवजड वाहनामुळे परिसरातील रस्त्यांचीही चाळण होत आहे . यापेक्षा भयानक म्हणजे येथे असलेल्या प्रचंड आकाराच्या खाणीतील वाळू स्वच्छ केल्या नंतरचे सर्व पाणी गावाशेजारच्या ओढयात सोडल्याने ते थेट ताम्रपर्णी नदिपात्रात सोडण्यात येत आहे . नदिला महापूर आल्या नंतर जेवढे गढूळ पाणी असते त्यापेक्षा अधिक या वाळू प्रकल्पातील गढूळ पाणी नदित दिसत आहे. 
     एक प्रकारची दलदलच नदित निर्माण झाली आहे . चिंचणे गावातील जनावारे याच नदितील पाणी पित असल्याने त्या जनावारांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे . तसेच हेच पाणी सार्वजनिक विहीरीत मिसळत असल्याने विहीरींचे पाणीही दूषित झाले आहे . या सर्वांची तात्काळ पहाणी करून हे नदि प्रदूर्षन थांबवण्याची मागणी चिंचणे ग्रामस्थांनी सी एल न्यूज प्रतिनिधी शी बोलताना केली.

No comments:

Post a Comment