टस्कर हत्तीचा वनविभागाच्या हायटेक नर्सरीमध्येच धुमाकूळ, पाण्याच्या टाक्या फोडून हत्तीने साजरे केले धूलिवंदन - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2024

टस्कर हत्तीचा वनविभागाच्या हायटेक नर्सरीमध्येच धुमाकूळ, पाण्याच्या टाक्या फोडून हत्तीने साजरे केले धूलिवंदन

हडलगे येथील सामाजिक वनिकरणाच्या हायटेक नर्सरीतील टस्कर हत्तीने फोडलेल्या पाण्याच्या टाक्या
तेऊरवाडी (एस. के. पाटील)
     आमच्या कोल्हापूर मध्ये ऐकावं ते नवलच राव....आता हेच बघा गेले महिनाभर कर्नाटक आणि महाराष्ट्र वनखात्याच्या  वादामध्ये हत्तीचा फुटबॉल झालेला आम्ही सगळ्यानी बघितला.
    आज तर हद्दच झाली राव. इतके दिवस सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या या टस्कर हत्तीने चक्क वनविभागातील नर्सरितच थेट एन्ट्री मारली आणि तिथं ठेवलेल्या सिंटॅक्स टाक्यांचा  फुटबॉल करून त्या फोडून चक्क धूलिवंद  साजरे केले.
    झालं काय तर सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडहिंग्लज यांची हडलगे या गावाजवळ घटप्रभा नदीकाठी हायटेक नर्सरी आहे. यामध्ये अथक प्रयत्न करून वाढविलेली अनेक जातींची जवळपास ३२५०० रोपे आहेत. येथील रोपांना पाणी पुरविण्यासाठी सींटॅक्स टाक्यांची व्यवस्था केली आहे. तसेन रात्रभर वीजपुरवठासाठी सौर दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नेसरी कोवाड रोडलगत हडलगे धरणा शेजारच्या याच  नर्सरीत गजराजाने सायंकाळी ५.३० वाजता तारेच्या कुंपना वरून दमदार  प्रवेश केला. याच वेळी या ठिकाणी उपस्थित असलेले  आमचे सी एल  न्यूज चे प्रतिनिधी संजय पाटील यांच्या समोर नासधूस  करत  पाण्याच्या टाक्या फोडून आज धूलिवंदन साजरे केले. या ठिकाणी रोपांना पाणी पुरवठा करण्यासाठी  बसवलेल्या  सामाजिक वनीकरण विभागाच्या ५ हजार लिटर पाण्याचा  दीड लाखाच्या ५ पाण्याच्या सिंटेक्स टाक्या फोडून टाकल्या. एवढ्यावरच थांबला  तर तो  हत्ती कसला...पुढे जाऊन पठ्ठ्यान तीन सौर ऊर्जेच्या खांबा बरोबरच तिथले  लोखंडी बोर्ड देखील  एखाद्या खेळण्याप्रमाणे  उन्मळून टाकले. यानंतर मोर्चा वळवला तो तिथल्या अपार कष्टाने उभा केलेल्या रोपवाटिके तील रोपांच्याकडे . येथील बांबू, लिंबू, काजू, सागवान, करंज, पेरू, जांभूळ अशा ४५०० रोपाना पायदळी तुडवत  आपला हिस्काच सामाजिक वनिकरण विभागाला दाखवला.यात मजूर कुट्टीच्या शेडचे सुद्धा काही प्रमाणात नुकसान करून आल्या मार्गी जंगलात परतला. यावेळी हत्तीने हि नासधूस सी एल न्यूजचे प्रतिनिधी संजय पाटील व वनकर्मजारी दत्तात्रय पाटील यांच्या समोर केली. या दोघानी या हत्तीला डोंगरात पिटाळून लावल्याने पुढील नुकसान टळले. सद्या या हत्तीचे वास्तव्य हडलगे - तेऊरवाडी येथील जंगलात असून नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन सामाजिक वनिकरण विभाग परिक्षेत्र गडहिंग्ल चे वनक्षेत्रपाल राजेश डी चौगुले , सहाय्यक लागवड अधिकारी एस एस पाटील यानी केले आहे.

 एस. एस. पाटील (सहाय्यक लागवड अधिकारी)
  जवळपास १३ फुट उंच असणाऱ्या या टस्कर हत्तीने हडलगे येथील नर्सरीचे प्रचंड नुकसान केले आहे. या परिसरात प्रचंड प्रमाणात बांबू व पाण्याची उपलब्धता असल्याने हत्तीचे वास्तव्य वाढले आहे. ग्रामस्थांनी जंगल परिसरात प्रवेश करताना सावधानता बाळगावी.

No comments:

Post a Comment