कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कल्याणपूर (ता. चंदगड) नजीकच्या दुर्गाडी डोंगरास आग लागून जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले. दुर्गाडी डोंगराच्या पूर्व दिशेस कल्याणपुर, उत्तरेस कागणी व हुंदळेवाडी, पश्चिमेस नागरदळे तर दक्षिण दिशेस बुक्कीहाळ खुर्द व बुद्रुक ही गावे आहेत. दोन दिवसांपूर्वी यातील हुंदळेवाडी व नागरदळे गावांच्या दिशेने टेकडीस आग लागली. यात लहान मोठी झाडे- झुडपे, गवत जळून भस्मसात झाले. लहान- मोठे प्राणी, पक्षी यांचे निवारे, घरटी, निवाऱ्यातील छोटे प्राणी, पक्षी होरपळले.
चारच दिवसांपूर्वी चंदगड तालुक्यातील पाटणे व चंदगड रेंजच्या वन अधिकाऱ्यांनी डोंगर व जंगलांना लावल्या जाणाऱ्या किंवा लागणाऱ्या आगी थांबवण्यासाठी तालुक्यातील नागरिकांचे प्रबोधन केले होते. असे वनवे लागून होणारे नुकसान किती मोठी आहे याबाबतची माहिती वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे व नंदकुमार भोसले यांनी तज्ञ मार्गदर्शकांकरवी विषद केली होती. तथापि अशा प्रबोधन शिबिरानंतर दोनच दिवसांत अशी मोठ्या प्रमाणात आग लागण्याची घटना चंदगड तालुक्याला निश्चितच शोभनीय नाही. अशी चर्चा पर्यावरण प्रेमींमधून ऐकू येत होती. दरम्यान आगीच्या दिवशी दुपारनंतर परिसरात वळीव पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या होत्या पण यापूर्वीच आगीने पूर्ण डोंगर वेढला होता.
No comments:
Post a Comment