पारगड ते मोर्ले रस्ता कामाबाबत पुन्हा फसवणूक....! १ एप्रिल रोजी वन कार्यालयासमोर उपोषण - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2024

पारगड ते मोर्ले रस्ता कामाबाबत पुन्हा फसवणूक....! १ एप्रिल रोजी वन कार्यालयासमोर उपोषण

पारगड ते मोर्ले रस्ता कामाबाबत पुन्हा फसवणूक....! १ एप्रिल रोजी वन कार्यालयासमोर उपोषण

दोडामार्ग : सी. एल. वृत्तसेवा 
         शिवकालीन पारगड किल्ला ते मोर्ले रस्ता सुरू झालेले काम बांधकाम विभाग, वन विभाग व लोकप्रतिनिधी यांच्या  असहकार्यामुळे  गेल्या चार वर्षापासून रखडले आहे. या कामाला सुरुवात व्हावी यासाठी गेल्या २० फेब्रुवारी रोजी दोडामार्ग येथे बांधकाम कार्यालय येथे उपोषण सुरु केले असता सत्ताधारी पक्षाचे नेते यांनी पंधरा दिवसात खडीकरण सुरू करतो असे सांगून उठवले. पण आज महिना झाला तरी कामाला सुरुवात झाली नाही. बांधकाम विभाग वन विभाग यांच्यावर झटकत आहे.  वन विभाग काम सुरू करायला मुदतवाढ देत नाही. तर आश्वासन देणारी नेते मंडळी लक्ष देत नाहीत. त्यामुळे संतापलेल्या पारगड दशक्रोशीतील ग्रामस्थ यांनी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्या कार्यालयासमोर याप्रश्नी १ एप्रिल रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा रघुवीर शेलार, ज्ञानेश्वर चिरमुरे व इतरांनी दिला आहे. 
       तिलारी घाटाला पर्यायी मार्ग दोन जिल्हे जोडणारा जवळचा मार्ग घाट सेक्शन नसलेला असा पारगड किल्ला ते मोर्ले  रस्ता झाला पाहिजे यासाठी आतापर्यंत ३० पेक्षा जास्त उपोषण तसेच आंदोलन झाली पण आश्वासनाशिवाय काही मिळालेले नाही. हे काम चार वर्षे बंद असताना ते पूर्ण करण्यासाठी बांधकाम विभाग वन विभाग तसेच लोकप्रतिनिधी यांनी दूर्लक्ष केले. यामुळे आता लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पारगड दशक्रोशीतील ग्रामस्थ यांनी घेतला आहे. 
    २० फेब्रुवारी रोजी दोडामार्ग बांधकाम विभाग या ठिकाणी उपोषण केले होते. यावेळी भाजपचे माजी आमदार राजन तेली, यांनी उपोषणाला भेट देऊन पालकमंत्री रविंद्र चव्हाण सोबत चर्चा करून पंधरा दिवसात खडीकरण सुरू केले जाईल असे सांगून उपोषणाला बसलेल्या लोकांना उठवले. पण अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. 
        सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत. आम्ही वन विभाग कडून मुदतवाढ मिळाली पाहिजे यासाठी सर्व  कागदपत्रे सादर केली असे सांगतात. तर वन विभाग कडून अद्याप काही हालचाल दिसत नाही. त्यामुळे पावसाळ्यात वाट आहे ती बंद होणार आहे. असे रघुवीर शेलार, ज्ञानेश्वर चिरमुरे यांनी सांगितले.  लोकप्रतिनिधी यांना काम सुरू करायचे नव्हते तर आम्हाला उठवले कशाला? आम्ही शेवटपर्यंत निर्णय होईपर्यंत उपोषणाला बसलो असतो असे सांगितले. 
       सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग यांनी आपसातील मतभेद दूर करून मार्च अखेर पूर्वी कामाला सुरुवात झाली नाही तर १ एप्रिल रोजी सावंतवाडी उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार शिवाय लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला जाईल असे रघुवीर शेलार, ज्ञानेश्वर चिरमुरे व इतरांनी सांगितले. या बाबत निवेदन संबंधित अधिकारी यांना पाठवली आहेत. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिली आहेत.

No comments:

Post a Comment