कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर, कालकुंद्री, किटवाड परिसरात २५ फेब्रुवारीला प्रथम दर्शन दिल्यानंतर टस्कर हत्ती गेल्या १० दिवसात महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागात स्थिरावल्याचे दिसत आहे. परिसरातील बेकिनकेरे, उचगाव, देवरवाडी, बेळगाव, कंग्राळी, कौलगे अशी वेगवेगळी गावे फिरत हत्तीने काल पुन्हा होसूर व बेकिनकेरे गावांच्या दरम्यान महाराष्ट्र- कर्नाटक हद्दीवरील स्वागत फलका नजीक नियोजित दादा सिटी परिसरात भर दिवसा ग्रामस्थ व प्रवाशांना दर्शन दिले.
त्यामुळे बेळगाव ते कोवाड येजा करणाऱ्या दुचाकी, छोटे वाहनधारक व प्रवासी वर्गात घबराटीचे वातावरण आहे. सायंकाळी व रात्री या रस्त्यावरून जाणे सद्यःस्थितीत धोक्याचे मानले जात आहे. या हत्तीसाठी परिसरात मुबलक चारा खाद्य उपलब्ध असल्याने त्याला येथून मुख्य अधिवासात घालवणे दोन्ही राज्यातील वन विभागासमोर मोठे आव्हान ठरले आहे. तर रोज वेगवेगळ्या ठिकाणावरून गावात हत्ती आल्याचे फोन वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना येत असल्याने तेही चक्रावून गेले असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment