कालकुंद्री येथील शिवारात मसूर, वाटाणा, मोहरी काढणीचे काम सुरू आहे. |
कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा
कर्यात भागातील गावांत भल्या पहाटेपासून ऊन होईपर्यंत मसूर, वाटाणा काढण्याची लगबग सुरू असून काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या दिवसांतील बदलत्या हवामानामुळे शेतकरी वर्गात कामाची घाई सुरू आहे.
गेल्या २० वर्षांपूर्वी मसूर, वाटाणा काढणीनंतर बैलांच्या साह्याने मळणी करावी लागत होती. पण सध्याच्या यांत्रिक युगात मळणी यंत्रामुळे शेतकऱ्यांचे कष्ट बऱ्यापैकी कमी झाले आहेत.
कर्यात भागातील वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या मसुरीला यंदा २५ ते ३० हजार रुपये प्रति क्विंटल दर असून यापूर्वी इंद्रायणी भाताला प्रती क्विंटल साडेतीन हजार रुपये दर मिळाला आहे. कमी काळात उसापेक्षा ही पिके अधिक फायदा मिळवून देणारी असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.
परिसरातील किणी, कालकुंद्री, कुदनूर, कोवाड, निट्टूर, कागणी, आदी १५-२० गावांच्या शिवारात भात कापणीनंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जमिनीतील ओलाव्यात मसूर, वाटाणा, मोहरी, गहू, हरभरा अशी रब्बी पिकांची पेरणी केली जाते. केवळ अडीच महिन्यात येणाऱ्या या पिकांना पाणी, खते, भांगलण असा कोणताच खर्च नाही. भाताबरोबरच मिळणाऱ्या पिंजर मुळे जनावरांच्या वैरणीच्या प्रश्नही मिटत आहे.
याउलट उसाच्या बाबतीत चौथाई- पाचवाई, महागडी खते, मजुरी, औषधे, अंतरमशागत, तोडणी- वाहतूकीत सध्या सुरू असलेली पिळवणूक आदींमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. याउलट ऊस कारखान्याला पाठवून बिलाची वाट पाहत बसण्यापेक्षा भात, मसूर थेट बाजारपेठेत विकून रोख पैसा शेतकऱ्यांच्या हातात पडतो. परिणामी भात व मसूर आदी कडधान्ये अशी डबल पिके येणाऱ्या जमिनीत ऊसाऐवजी ही पिके घेतलेली बरी! अशी मानसिकता तयार होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment