हत्ती गेला आणि गवे आले....! , चंदगड तालुक्याच्या पूर्व व सीमा भागात धुमाकूळ - चंदगड लाईव्ह न्युज

16 March 2024

हत्ती गेला आणि गवे आले....! , चंदगड तालुक्याच्या पूर्व व सीमा भागात धुमाकूळ

गव्याचे संग्रहित छायाचित्र

कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा
      हत्ती गेला आणि गवे आले उपद्रव मात्र कायम..! ही स्थिती आहे चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील होसूर, कौलगे, सुंडी, करेकुंडी, देवरवाडी, महिपाळगड तसेच कर्नाटक व्याप्त सीमा भागातील बेकिनकेरे व परिसरातील.  
    डोंगर भागात वास्तव्यास असलेले वन्यप्राणी पाणी, खाद्याच्या शोधात  लोकवस्तीत घुसू लागले आहेत. अधून मधून येणाऱ्या हत्तींसोबतच चंदगड तालुक्यात गेल्या काही वर्षांत डोंगर परिसरा बरोबरच नागरी वस्ती जवळील शिवारात गवे, रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. बेकिनकेरे गावात गुरुवारी दोन गव्यांनी भरदिवसा धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्ती गेला अन् गव्यांचा कळप आला. त्यामुळे हत्ती बरा म्हणायची वेळ शेतकरी व ग्रामस्थांवर आली आहे.
       गव्यांकडून पिकांचे अतोनात नुकसान सुरू आहे. वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणेही धोकादायक बनले आहे. गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास दोन गवे शेताकडे जाणाऱ्या नागरिकांच्या नजरेस पडले. दरम्यान गावकऱ्यांच्या हुसकावणीमुळे ते बिथरले आहेत. ग्रामस्थांनी सतर्क रहावे, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. गावाच्या वेशीवर आलेल्या गव्यांमुळे एकच खळबळ मजली आहे. मागील १५ दिवसांत हत्तींनी धुमाकुळ घातला होता. आता गवे आल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
  गव्यांना पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. मात्र ग्राम पंचायतीने गव्यांपासून लांब रहावे, असे आवाहन केले. सीमाहद्दीवर असलेल्या बेकिनकेरे, बसुर्ते, अतिवाड आणि चंदगड तालुक्यातील कौलगे-होसूर, सुंडी परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. दरम्यान डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात वन्यप्राणी मुक्तपणे संचार करू लागले आहेत. आता तर चक्क वन्यप्राणी भरदिवसा गावात शिरू लागले आहेत. कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी वनखात्याने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

No comments:

Post a Comment