चंदगड तालुक्यातील उमेदवाराकडून कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, लोकसभेच्या इतिहासातील चंदगड तालुक्यातील दुसरा अर्ज - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2024

चंदगड तालुक्यातील उमेदवाराकडून कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल, लोकसभेच्या इतिहासातील चंदगड तालुक्यातील दुसरा अर्ज

कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना ब्लॅक पॅंथर पक्षाचे प्रमुख सुभाष देसाई व इतर सहकारी

चंदगड / सी. एल. वृतसेवा

     कोल्हापूर लोकसभेसाठी चंदगडकर देखील मागे राहिले नाहीत. यापूर्वी प्रत्येक वेळी चंदगड तालुक्यातील लोक केवळ लोकसभा उमेदवाराच्या प्रचाराच्या ताफ्यामध्ये दिसायचे. पण कोणाचेही धाडस होत नव्हते. लोकसभा कोल्हापूर लढवायची म्हटलं की अनेकांना घाम फुटायचा. पण हे धाडस दाखवले आहे, चंदगड तालुक्यातील कोकरे येथील ब्लॅक पॅंथर पक्षाचे प्रमुख सुभाष देसाई यांनी. 

     47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून ब्लॅक पँथर पक्ष पुरस्कृत उमेदवारी अर्ज ब्लॅक पँथर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी शुक्रवार दिनांक 19/04/2024 रोजी कोल्हापूर जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांचेकडे दाखल केला. यावेळी करवीर तालुका अध्यक्ष प्रविण कांबळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दयानंद कांबळे, युवक अध्यक्ष विजय माने, कागल तालुका उपाध्यक्ष विठ्ठल कांबळे उपस्थित होते.

लोकसभेसाठी पहिला अर्ज चंदगड शहरातील चेतन शेरेगार यांचा

    कोल्हापूर लोकसभेच्या इतिहासात आत्तापर्यंत चंदगड तालुक्यातील दोघांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यापैकी पहिला अर्ज 2014 साली कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना खासदार झालेले लोक कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर वसलेल्या व महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या चंदगड तालुक्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी चेतन शेरेगार यांनी हा उमेदवारी अर्ज भरला होता. त्यावेळच्या लोकसभेसाठी उमेदवारांनी चंदगडमध्ये येऊन प्रचार केला होता. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी 6,114 एवढी मते मिळवली होती.

       ब्लॅक पॅंथर पक्षाचे सर्वेसर्वा सुभाष देसाई हे मूळचे चंदगड तालुक्यातील कोकरे गावचे आहेत. सध्या ब्लॅक पॅंथरच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यापासून सर्वसामान्य न्याय हक्कासाठी ते लढत असतात. सामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढत असताना त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ब्लॅक पॅंथरचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.


No comments:

Post a Comment