हत्तीने सुधिर पाटील यांच्या जेसिबीचे केलेले नुकसान |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
गेल्या १५ दिवसा पासून तेऊरवाडी - हडलगे जंगलात वास्तव्यास असणाऱ्या टस्कर हत्तीने शेती पाईपलाईन खुदाईसाठी हडलगे (ता. गडहिंग्लज) येथे शेतात उभा असलेल्या सुधिर विष्णू पाटील यांच्या मालकीच्या जेसीबी ( MH 04 LH 2451 ) या मशिनवरच हल्ला करून मोडतोड केली. शेजारी ट्रॉलीमध्ये असणारे पाईपही विस्कटून टाकले. वारंवार होणाऱ्या हत्तींच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी हत्तीचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील अशोक जोतिबा पाटील हे गडहिंग्लज तालूक्यातील घटप्रभा नदिवरून तेऊरवाडी येथे शेती पाईपलाईन टाकत आहेत. या लाईनचे काम जेसिबी मशिनच्या साह्याने चालू आहे. काल सायंकाळी काम संपवून जेसिबी शेतातच उभा केला होता. रात्री या जेसिबीवर हत्तीने हल्ला केला. जेसिबीच्या काचा फोडल्या तर शेजारील ट्रॉलीतील पाईप विस्कटून टाकले. तसेच शेतातील केळीच्या झाडांचे नुकसान केले.
मागील आठवड्यात या हत्तीने वन विभागाच्या हायटेक नर्सरीयर हल्ला करून जवळपास २ लाखांचे नुकसान केले होते. तसेच घटप्रभा नदिपात्रातील विद्युत मोटारींचे बॅरल फोडून पाईपलाईनचे नुकसान केले होते. या परिसरात हत्तीकडून वारंवार नुकसान केले जात आहे. त्यामुळे या हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वनविभाग सुस्त
गेले १५ दिवस या परिसरात हत्तीचा वावर असूनही वनविभागाने मात्र याकडे पाठ फिरवली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
No comments:
Post a Comment