ढेकोळी येथे गोवा बनावटीची दारू वहातूक करताना हलकर्णीच्या युवकाला अटक, साडेसात लाखाचा मुद्देमाल जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2024

ढेकोळी येथे गोवा बनावटीची दारू वहातूक करताना हलकर्णीच्या युवकाला अटक, साडेसात लाखाचा मुद्देमाल जप्त

  


चंदगड / प्रतिनिधी

       ढेकोळी (ता. चंदगड) येथे गोव्याहून बेकायदेशीर दारूची विनापरवाना वाहतूक करताना उत्पादन शुल्क च्या भरारी पथकाने कारवाई करून ७ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी संजय पांडुरंग नाईक (वय ३८, रा. हलकर्णी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) या आरोपीस अटक केली आहे.

       आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू निर्मिती, वाहतूक, विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम हाती घेतली आहे. भरारी पथकांस मिळालेल्या माहितीवरून, ढेकोळी - सुरुते रस्त्यानजिक असलेल्या प्राथमिक शाळेजवळ ही गोवा बनावटीच्या अवैध्य दारूची वाहतूक होणार असल्याची टीप मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी पाळत ठेवून काल रात्री साडेसातच्या सुमारास दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनास थांबवून तपासणी केली. त्यामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा साठा सापडला. वाहनासह ७ लाख ८४ हजार २०० इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

      यामध्ये निव्वळ मद्याची किंमत १लाख ४४ हजार इतकी आहे. या प्रकरणी आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हयाच्या ठिकाणी मिळुन आलेल्या आरोपी व्यतीरीक्त त्याच्या इतर साथीदाराचा सहभाग आहे का? याबाबतचा तपास सुरू असल्याचे तपासी अधिकारी निरीक्षक एस. एम. मस्करे यांनी सांगितले. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक एस. एम. मस्करे, दु. निरीक्षक जी. बी. कर्चे, दु. निरीक्षक ए. बी. साबळे, जवान सचिन लोंढे, मारुती पोवार, राजेंद्र कोळी, विशाल भोई, साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला. अधिक तपास निरीक्षक एस. एम. मस्करे करत आहेत. 

No comments:

Post a Comment