जळत्या झाडांमुळे कोवाड- कागणी रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा, झाडे जाळणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईची मनसे ची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2024

जळत्या झाडांमुळे कोवाड- कागणी रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा, झाडे जाळणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईची मनसे ची मागणी

कोवाड, कागणी रस्त्यावर झाडे अशी दिवसाढवळ्या पेटत असतात पण इकडे कोणत्याच शासकीय विभागाचे लक्ष नाही.
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
      कोवाड ते कागणी रस्त्याच्या दुतर्फा असलेली लाख मोलाची झाडे राजरोस पेटवली जात आहेत. अर्धवट जळालेल्या या झाडांमुळे हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. ही झाडे पेटवणाऱ्या समाज विघातक प्रवृत्ती शोधून कठोर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडील असा इशारा चंदगड तालुका मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

     सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने २२ वर्षापूर्वी सन २००२ मध्ये कोवाड, कागणी ते होसूर रस्त्याच्या दुतर्फा विविध जातींची शेकडो झाडे लावण्यात आली होती. २०-२२ वर्षांत  ही झाडे फुटापर्यंत उंच वाढली आहेत. येथून प्रवास करणाऱ्या बाहेरच्या प्रवाशांना या झाडांमुळे बनलेली नैसर्गिक कमान आकर्षित करते. प्रवासी आपल्या गाड्या थांबवून  येथे सेल्फी काढताना दिसतात. तथापि सध्या या झाडांची राजरोसपणे जाळपोळ सुरू आहे. हे विदारक दृश्य पर्यावरण प्रेमी व हजारो प्रवासी रोज हाताशपणे पहात असतात.        
      गेल्या ७-८ वर्षांत ७०  टक्के झाडे जाळून किंवा तोडून लांबवण्यात चोरटे यशस्वी झाले आहेत. उन्हाळा सुरू झाला की आजूबाजूचा पालापाचोळा झाडांच्या बुंध्यालगत गोळा करून दिवसाढवळ्या झाडे पेटवली जातात. पोलीस, सार्वजनिक बांधकाम, सामाजिक वनीकरण, वन विभाग  अशा कोणत्याच विभागाचा वचक नसल्याने चोरटे अधिकच निर्ढावले आहेत. या घटनेचा तीव्र निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झाडे जळणाऱ्या समाजकंटकांना शोधून कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन लवकरच संबंधित विभागांना देणार असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाटील, तालुका सचिव तुकाराम पाटील, शहर अध्यक्ष सुनील तलवार, संभाजी मनवाडकर, बाळ गिरी, अरुण कित्तूरकर, संतोष हागिदळे, मष्णू आम्बेवाडकर, पुरषोत्तम सुलेभावकर आदी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment