मान्यवरांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील व त्यांच्या सौभाग्यवती सौ. सुजाता पाटील. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील यांना नुकताच त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल 'जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. समाजक्रांती विशेषांक व अन्वय ग्राफिक्स आयोजित 'संविधान संवाद व भारतीय संविधान कार्यगौरव सन्मान पुरस्कार सोहळा २०२४' या कार्यक्रमात राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक विषमता असलेल्या आपल्या देशात भारतीय संविधानाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्वावरील मानवतेच्या आदर्शावर उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्ती व संस्थांना हा मानाचा पुरस्कार दिला जातो.
सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील १९८९ मध्ये कालकुंद्री गावचे सरपंच झाले. यावेळी त्यांनी चंदगड तालुका सरपंच संघटनेची स्थापना केली. संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य करताना तालुक्यातील ११० सरपंचांना एकत्र करून त्यांचे प्रबोधन करत गावागावात विकास कामे आणण्याचे कार्य केले. कालकुंद्री येथे सरपंच असताना घर तेथे पाणी, वीज, रस्ता, गरिबांसाठी घरकुले, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना गायी, म्हशी, बैलजोडी शेती अवजारे पुरवण्याबरोबरच ग्रामपंचायत, अंगणवाडी, सेवा सोसायटी इमारत उभारणी केली. शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून तालुक्यात पाटबंधारे योजना मार्गी लावण्यासाठी आवाज उठविला.
कालकुंद्री येथे १९७९ मध्ये तालुक्यातील पहिली सहकारी दूध संस्था स्थापन केली. यावेळी भारत सरकारने १९८० ते ८२ प्रयोगिक तत्त्वावर शालेय मुलांना सकस आहार योजनेंतर्गत दूध देण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी परिसरातील १० शाळातील मुलांना दररोज दूध पुरवठा करणारी काशिर्लिंग दूध संस्था ही जिल्ह्यातील पहिली संस्था ठरली. ही योजना नंतर देशभर लागू करण्यात आली. १९८४ मध्ये ते प्रथम ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले. तेव्हापासून त्यांच्या सामाजिक कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. २०१२ मध्ये त्यांच्या सौभाग्यवती सुजाता मारुती पाटील या मोठ्या मताधिक्याने जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्या माध्यमातूनही कुदनूर मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लागली. या सर्व कार्याची दखल जीवनगौरव पुरस्कार निवड प्रसंगी घेण्यात आली.
शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे झालेल्या पुरस्कार वितरण प्रसंगी गोकुळ दूध संस्थेचे चेअरमन विश्वास पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आम. डॉ. सुजित मिणचेकर, उत्तम कांबळे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी, साहित्यिक प्रा. गिरीश मोरे, गंगाधर म्हमाणे, वैभव प्रधान आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment