कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर ते किटवाड मार्गावरील छोट्या ओढ्यावर मोरीचे बांधकाम सुरू आहे. संथ गतीने सुरू असलेल्या या बांधकामाची गती वाढवावी तसेच दोन मोठी वाहने सहज जातील इतपत रुंदीकरण करावे. अशी मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. मोरी बांधण्यासाठी बाजूने काढलेला पर्यायी सर्विस मार्ग वाहन चालवण्यासाठी धोकादायक असून तो व्यवस्थित करण्याची मागणी होत आहे.
कुदनुर ते किटवाड हा ४ किमी लांबीचा चिखलमय रस्ता अनेक वर्षांच्या मागणीनंतर गेल्या एक-दोन वर्षात डांबरीकरण करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा प्रवास काही प्रमाणात सुखकर झाला आहे. सध्या या मार्गावरील ओढ्यावर मोरीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम दर्जेदार करण्याबरोबरच कामाची गती वाढवावी व रुंदीकरण करावे. तसेच बांधकामामुळे येथे पर्यायी रस्ता काढण्यात आला आहे. तथापि तो वाहतुकीस अत्यंत धोकादायक असून या ठिकाणी लहान मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या परिसरात अधुन मधून वळीव पाऊस सुरू आहे पाऊस पडलेला असताना या रस्त्यातून वाहने चालवणे केवळ अशक्य आहे. तरी हा रस्ता भराव टाकून वाहने चालवण्यायोग्य करावा अशी मागणी होत आहे.
याच मार्गावर किटवाड ते कुदनूर पर्यंत येणाऱ्या ओढ्यातून वरच्या शिवारात पाणी नेण्यासाठी पाईपलाईन चरी मारल्या जातात. सध्या चांगल्या रस्त्यात खुदाई केलेल्या ३-४ चरी वेगवान वाहनांसाठी धोकादायक व जीवघेण्या ठरत आहेत. तरी संबंधित बांधकाम विभागाने खुदाई केलेल्या या चरी डांबरी पॅचवर्क ने तात्काळ बुजवून रस्ता वाहतुकीस निर्धोक करावा अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment