बुंधे जाळलेली झाडे वाहनधारकांसाठी बनताहेत कर्दनकाळ....! कागणी रस्त्यावरील अनेक झाडे वादळात जमीनदोस्त - चंदगड लाईव्ह न्युज

01 May 2024

बुंधे जाळलेली झाडे वाहनधारकांसाठी बनताहेत कर्दनकाळ....! कागणी रस्त्यावरील अनेक झाडे वादळात जमीनदोस्त

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

     उन्हाळ्यात मुद्दामहून बुंध्यांना आगी लावल्याने कमकुवत झालेली कागणी- कोवाड रस्त्यावरील अनेक झाडे वादळी वाऱ्यात मोडून रस्त्यावर पडत आहेत. ही झाडे प्रवासी आणि वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत.

       २३-२४ वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागामार्फत ही झाडे लावण्यात आली आहेत. तथापि उंचच उंच वाढल्याने आजूबाजूच्या शिवारात झाडांच्या छायेमुळे पिके येईनाशी झाली आहेत. त्यामुळे रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना ही झाडे नकोशी झाली आहेत. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या या झाडांमध्ये निलगिरी, गुलमोहर, सुबाभूळ,आकेशा आदी विविध झाडांपैकी काही झाडे लाकडी फर्निचर साठी उपयुक्त असल्याने लाकूड चोरट्यांचाही डोळा या झाडांवर आहे. यातूनच उन्हाळ्यात झाडाचा झाडाच्या बुंध्यात पालापाचोळा पेटवून झाडे कमकुवत केली जातात.

       झाडे पडली पाहिजे यासाठी वैशाख, जेष्ठ व आषाढ महिन्यातील येणाऱ्या वादळी वाऱ्यांची वाट पाहिली जाते. गेल्या आठ दिवसात दोन-तीन वेळा आलेल्या अशाच वादळामुळे यातील कमकुवत झालेली अनेक झाडे मोडून रस्त्यावर पडली आहेत व पडत आहेत. मात्र मोडून व उन्मळून पडणारी ही झाडे येथून जाणाऱ्या शेकडो वाहनधारक व प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. त्यामुळे झाडे जळणाऱ्या प्रवृत्तींचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे. तसेच अत्यंत कमकुवत झालेल्या झाडांची योग्य ती विल्हेवाट लावावी. अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांसह प्रवासी व वाहनधारकातून होत आहे.

No comments:

Post a Comment