चंदगड आगाराची अनागोंदी....!, कालकुंद्री- बेळगाव बस पुन्हा रद्द, कर्नाटक डेपोची बस सुरू करण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

26 May 2024

चंदगड आगाराची अनागोंदी....!, कालकुंद्री- बेळगाव बस पुन्हा रद्द, कर्नाटक डेपोची बस सुरू करण्याची मागणी

 

कालकुंद्री येथून ये जा करणाऱ्या सर्व बस गाड्यांना प्रवाशांची अशी नेहमी गर्दी असते.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
  एसटी महामंडळाच्या चंदगड आगारातील अधिकाऱ्यांच्या मनमानी व अनागोंदीमुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातून लालपरी अदृश्य होण्याच्या मार्गावर आहे. चंदगड आगाराला सर्वाधिक उत्पन्न  देणारी चंदगड कालकुंद्री बेळगाव ही कालकुंद्री मुक्काम बस आज दि २६ मे रोजी पुन्हा रद्द करण्यात आल्याने मार्गावर थांबलेल्या शेकडो प्रवाशांनी आगाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. आगारातील निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी रास्ता रोको चा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तर अनेक प्रवाशांनी चंदगड आगाराची बस कायमची बंद करून कर्नाटक आगाराची बस सुरू करण्याची  मागणी केली आहे.
   चंदगड एसटी आगाराला गेल्या पंधरा वर्षात ७-८ व्यवस्थापक झाले तरी चंदगड तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनियमित असलेल्या एसटी फेऱ्या दिवसेंदिवस अधिकच अनियमित किंवा कायमच्या रद्द जात आहेत. परिणामी  आगाराची अवस्था दिवसेंदिवस 'बुडत्याचा पाय खोलात' अशीच होताना दिसत आहे. पन्नास वर्षांपूर्वी सुरू झालेले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे चंदगड एसटी आगार उत्पन्नाच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अव्वल होते. तथापि अलीकडील काळातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आगाराची अवस्था दयनीय झाली आहे. तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या अनेक मुक्कामी गाड्या कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. दिवसभरातील फेऱ्यांचीही कधीच शाश्वती नसते. 


   कालकुंद्री गावातून धावणाऱ्या सर्वच गाड्यांना नेहमी गर्दी असते आजही बेळगाव ला जाणारे २५ प्रवासी दुपारी २ वाजता बेळगाव ला जाणाऱ्या बससाठी दीड वाजल्यापासून स्टॉप वर थांबून होते. यातील अनेकांना सायंकाळी बेळगाव येथून रेल्वेने पुढे जायचे होते. तथापि बस अचानक रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. हीच अवस्था या मार्गावरील पुढे २९ स्टॉप वर थांबलेल्या प्रवाशांची झाली असावी. 
  चंदगड येथून सायंकाळी साडेसहा वाजता सुटणारी कुदनूर मुक्काम बसही गेले वर्षभर बंद आहे ती सुरू करण्याची मागणी होत असताना आहेत त्या गाड्या रद्द करण्याचा सपाटा अधिकाऱ्यांनी लावल्याने प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 
 कालकुंद्री मुक्काम बस नियमित सोडता येत नसेल तर चंदगड आगाराने येथे कर्नाटक डेपोची बस सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बेळगाव, हंदिगनूर मार्गे कालकुंद्री ही बस ४५ वर्षांपूर्वी पासून सुरू होती. ती गेल्या पंधरा-वीस वर्षात बंद पडली आहे. या फेरीचे बेळगाव आगार प्रमुखांना भेटून पुनरुज्जीवन करावे अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment