दुंडगे येथील हनुमान मंदिर वास्तुशांती कार्यक्रम १७ ते २० मे रोजी आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

13 May 2024

दुंडगे येथील हनुमान मंदिर वास्तुशांती कार्यक्रम १७ ते २० मे रोजी आयोजन

 


कुदनूर : सी. एल. वृत्तसेवा

     दूंडगे (ता. चंदगड) येथे भाविकांच्या देणगीतून जिर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री हनुमान भव्य मंदिराची वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहन कार्यक्रम शुक्रवार दि. १७  मे ते सोमवार दि. २० मे २०२४ रोजी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकांचे अनावरण दि १० मे रोजी ग्रामदैवत श्री ब्रह्मदेव मंदिर येथे करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत कमिटी सदस्य, हनुमान जीर्णोद्धार कमिटी सर्व भक्तगण उपस्थित होते.

       चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी (१७ मे) मुहूर्तमेढ, देवदेवतांना आवाहन, ग्रामदैवत अभिषेक, ध्वजारोहण होणार आहे. दुसऱ्या दिवशी (१८ मे) कळस व मूर्ती मिरवणूक, विना पूजा, गणेश पूजन, गोमाता पूजन, जलाधिवास, धान्याधिवास, मंडप पूजन, वरूण देवता पूजन, पर्णकुटी पुजन आदी कार्यक्रम नियोजन करण्यात आले असून देणगीदाराचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. त्या रात्री कीर्तनकार ह भ प गायत्रिताई थोरबोले (आळंदी) यांचे कीर्तन होईल.

     तिसऱ्या दिवशी (१९ मे)  सकाळी गाभारा पूजन, तुळस पुजन, मंदिर चौकट, गाभारा, हनुमान मूर्ती पूजन. दुपारी ३ वाजता माहेर वाशिणींचा हळदी कुंकू मेळावा. रात्री ७ वाजता ह भ प. तुषार महाराज दळवी (आळंदी) यांचे कीर्तन व जागर होईल.

   चोथ्या दिवशी (दि.२०) सकाळी अजनेय स्वामी रुद्राभिषेक, उर्वरित होम हवन सर्व ग्रामस्थ आणि भक्तजन यांच्या हस्ते होईल. श्री प्र ब्र गुरूसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी (श्री सुरगीश्र्वर मठ) यांच्या हस्ते मुर्ती प्राण प्रतिष्ठापना व कळसारोहण, अलंकार, पूर्णाहूती,महाआरती, आशिर्वचन मंदिर लोकार्पण सोहळा. तर दुपारी १२ नंतर महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत दीपोत्सव कार्यक्रम होईल. असा हा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चार दिवसातील सर्व कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन हनुमान भक्त मंडळ, ग्रामस्थ दुंडगे यांच्या वतीने केले आहे.

No comments:

Post a Comment