कोवाड कागणी रस्त्यावरील तो जीवघेणा खड्डा पुन्हा 'ॲक्टिव्ह मोडवर' - चंदगड लाईव्ह न्युज

12 May 2024

कोवाड कागणी रस्त्यावरील तो जीवघेणा खड्डा पुन्हा 'ॲक्टिव्ह मोडवर'

 

कोवाड- कागणी राज्य रस्त्यावरील जीवघेणा ठरत असलेला हाच खड्डा

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
  कोवाड ते कागणी रस्त्यावरील दोन वर्षांपूर्वीचा तो जीवघेणा ठरलेला खड्डा पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर आला आहे. या खड्ड्यातून जाणारी अनेक वाहने नादुरुस्त होत असून पुन्हा कोणा प्रवाशाचा जीव जाण्यापूर्वी येथे पॅचवर्क करावे अशी मागणी होत आहे.
  कोवाड ते कागणी हा ३ किमी लांबीचा टप्पा नेसरी ते बेळगाव राज्य मार्गावरील किंबहुना चंदगड तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. रस्त्याच्या दुतर्फा बुंध्यातून जाळलेल्या झाडांमुळे मुळातच मृत्यूचा सापळा बनलेला हा रस्ता येथे पडलेल्या दोन-तीन खड्ड्यांमुळे पुन्हा जीवघेणा ठरला आहे. येथून आजरा, गडहिंग्लज, नेसरी, माणगाव, कामेवाडी, ढोलगरवाडी, किणी कडून उचगाव, शिनोळी, बेळगाव तसेच कालकंद्री, कुदनूर, दड्डी कडे जाणारी हजारो वाहने रोज ये जा करत असतात. दोन वर्षांपूर्वी याच खड्ड्याने होसूर येथील एका महाविद्यालयीन तरुणीचा बळी घेतला होता. दुचाकी वर मागे बसून जाणारी ही तरुणी गाडी खड्ड्यात गेल्याबरोबर उडून बाहेर फेकली गेली व डोक्याला मार लागून जागीच ठार झाली होती. या घटनेनंतर हा खड्डा पॅचवर्क करून मुजवण्यात आला होता. तथापि तो गेल्या काही महिन्यापासून पुन्हा निर्माण झाला असून ऍक्टिव्ह मोडवर आला आहे. मार्गावरून भरधाव जाणारी वाहने नेमकी या खड्ड्यातून जात असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तर लहान मोठी वाहने नादुरुस्त होऊन आर्थिक फटका बसत आहे. येथे मोठा अपघात होण्यापूर्वी मार्गावरील हे दोन चार खड्डे संबंधित बांधकाम विभागाने डांबरी पॅचवर्कने तात्काळ दुरुस्त करावेत अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment