करेकुंडी तलावात बुडून मृत्यू झालेल्या जवानाच्या कुटुंबीयांचे सुभेदार मेजर चव्हाण यांच्याकडून सांत्वन - चंदगड लाईव्ह न्युज

23 May 2024

करेकुंडी तलावात बुडून मृत्यू झालेल्या जवानाच्या कुटुंबीयांचे सुभेदार मेजर चव्हाण यांच्याकडून सांत्वन

करेकुंडी येथील मयत माजी सैनिक विजय शेनोळकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन प्रसंगी सुभेदार मेजर गजानन चव्हाण व इतर
चंदगड : सी एल वृत्तसेवा
  करेकुंडी (ता. चंदगड) येथे माजी सैनिक विजय विठोबा शेनोळकर व दोन शाळकरी मुलींचा गावानजीकच्या पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने तीन कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला या  कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी विजय शेनोळकर निवृत्ती पूर्वी सेवेत असलेल्या ७ मराठा युनिटचे सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांनी करेकुंडी येथे भेट देऊन दुखी कुटुंबियांचे सांत्वन केले. 


     ६ मे २०२४ रोजी जवान विजय  शेनोळकर हे उन्हाळी सुट्टी निमित्त त्यांच्याकडे आलेली आसगाव येथील साडू ची मुलगी कु. चैतन्या नागोजी गावडे, वय १२ व भावाची मुलगी कु समृद्धी अजय शिनोळकर वय १२ रा. करेकुंडी (सध्या राहणार वैतागवाडी) हे तिघे पोहण्यासाठी घरानजीकच्या तलावात गेले होते तथापि पोहताना दोन्ही मुलींची दमछाक झाल्याने त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात दलदलीत रुतून विजय व दोन्ही मुलींचा दुर्दैवी अंत झाला होता.
   या घटनेची माहिती मिळाल्यावरून कानपूर येथे तैनात असलेल्या ७ मराठा कंपनीचे सुभेदार मेजर गजानन चव्हाण (मुळगाव निपाणी) यांनी जवानाच्या कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले. पत्नी व कुटुंबातील सदस्यांना सैनिक बोर्डाकडून मिळणाऱ्या सोयी सुविधा यांची माहिती देऊन त्याबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जवान विजय शेनोळकर यांच्या पत्नी ज्योती, मुलगी हर्षा, मुलगा किरण व मातोश्री यांची उपस्थिती होती. सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांच्यासमवेत '७ मराठा' कंपनीचे सेवानिवृत्त सुभेदार निवृत्ती अडकुरकर (तुर्केवाडी), हवालदार नारायण मणगुतकर (किणी), हवालदार नागेश धर्मोजी (कोवाड), हवालदार पांडुरंग लोहार (ढोलगरवाडी), धनाजी भाटले (निपाणी), चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार श्रीकांत पाटील (कालकुंद्री) आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment