बुक्कीहाळ खुर्द येथे बिर्जे कुटुंबीयांनी रोपे लावून त्यांच्या मुळाशी रक्षा विसर्जन केले यावेळी कुटुंबीय, नातेवाईक व ग्रामस्थ |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
घरातील व्यक्तीच्या निधनानंतर अग्निसंस्कार केले जातात. यानंतर राहिलेली अस्थी व राख तिसऱ्या दिवशी जवळच्या नदी तलावात विसर्जित करण्याचा प्रघात आहे. काही धनवान व धार्मिक पगडा असलेली कुटुंबे अशी रक्षा मोठ्या नदी संगमावर धार्मिक स्थळी सोडतात. यामुळे अशा ठिकाणी नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. मानव व जलचरांना अपायकारक ठरणारे असे प्रदूषण टाळण्यासाठी समाजातील अनेक व्यक्ती संस्था प्रयत्नशील असतात. त्यातच आता चंदगड तालुक्यातील बुक्कीहाळ खुर्द येथील बिरजे कुटुंबीयांची गणना करावी लागेल.
पुरोगामी विचारसरणीच्या या कुटुंबातील विठोबा धोंडीबा बिर्जे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. तिसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन नदीत करण्याऐवजी या कुटुंबाने अस्थी व रक्षा झाडांची रोपे लावून त्यांना घालण्याचे ठरवले. यासाठी आंबा, चिकू, नारळ, आवळा, कडूनिंब अशा पाच रोपांची निवड करून ती शेतात लावली. मयत विठोबा यांच्या पत्नी श्रीमती द्रोपदी सर्व कुटुंबीय व ग्रामस्थांच्या हस्ते आरोपांच्या मुळांना रक्षा विसर्जन करण्यात आले.
बिर्जे कुटुंबियांचे पाहुणे बुक्कीहाळ बुद्रुक चे रहिवाशी प्राथमिक शिक्षक सोनाप्पा दत्तू कोकितकर यांनी मांडलेली ही संकल्पना सुशिक्षित व पुरोगामी विचारसरणीच्या बिर्जे कुटुंबियांनी उचलून धरली व प्रत्यक्षात आणली. हा अनुकरण शील पायंडा यापुढील काळात गाव व परिसराला दिशादर्शक ठरेल असे विचार विद्यमान उपसरपंच व माजी सरपंच जोतिबा मारुती बिर्जे यांनी व्यक्त केले. यावेळी बिरजे कुटुंबीयांचे नातेवाईक पाहुणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निट्टूर येथेही प्रथा बदलली
अशाच प्रकारचा उपक्रम चंदगड तालुक्यातील निट्टूर येथे राबवण्यात आला होता. तेथील भैरवनाथ सहकारी दूध संस्थेचे माजी चेअरमन कृष्णा सतबा पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर अस्थी व राख नदीत टाकण्याऐवजी शेतातील झाडे व ऊस शेतीमध्ये पसरवून टाकण्यात आली होती. या घटनेच्या चार दिवस आधी आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पाटोदा येथील सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान गावात आयोजित केले होते. त्यावेळी त्यांनी "आपण आवडत्या व्यक्तीच्या निधनानंतर रक्षाविसर्जन नदीत करतो त्यामुळे नदीचे प्रदूषण किती होते?" असा सवाल करत प्रबोधन केले होते. याची दखल घेत ग्रामस्थांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी रक्षा विसर्जन नदीत न करण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्षात कार्यवाही सुरू केली.
तसेच येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान कै मारुती गणेश नाईक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीच्या बाबतीत विधवा प्रथा बंद करून नवा सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.
चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग येथेही दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ चे निवृत्त वायरमन राजाराम पाटील यांच्या निधनानंतर त्यांची रक्षा विसर्जन नदी ऐवजी त्यांच्या कुटुंबीयांनी शेतातील रोपांच्या मुळांना केले होते.
No comments:
Post a Comment