बदल्या झाल्यानंतरच पदोन्नती द्यावी...! कार्यरत मुख्याध्यापकांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

29 May 2024

बदल्या झाल्यानंतरच पदोन्नती द्यावी...! कार्यरत मुख्याध्यापकांची मागणी


पदोन्नती पूर्वी पात्र मुख्याध्यापकांच्या बदल्या कराव्यात या मागणीसाठी कोल्हापूर येथे जमलेल्या मुख्याध्यापकांसोबत मुख्याध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष संभाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष संजय कुर्डूकर, सरचिटणीस पी डी सरदेसाई, कार्याध्यक्ष श्रीकांत गुर्जर, कोषाध्यक्ष राजेंद्र सणगर आदी पदाधिकारी

चंदगड : सी एल वृत्तसेवा

  निवडणूक आचारसंहितेमुळे यंदा प्रशासकीय बदल्या थांबवण्यात आल्या असून नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्याध्यापक व शिक्षकांच्या विनंती बदल्या होणार आहेत. या बदल्या शिक्षकांतूनच होणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नती व नवीन शिक्षक भरती पूर्वी करण्यात याव्यात. या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सध्या कार्यरत पात्र मुख्याध्यापकांनी एल्गार पुकारला आहे. शासनाच्या सध्याच्या वेळापत्रकानुसार आधी पदोन्नती व नंतर बदल्या असा क्रम आहे तो बदली इच्छुक मुख्याध्यापकांना मान्य नाही. या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून मागणीचे निवेदन देण्यासाठी जिल्ह्यातील पात्र मुख्याध्यापक कोल्हापूर येथे एकवटले होते. 

    या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघ व इतर संघटनांनीही पाठिंबा व्यक्त केला आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनात नियोजित वेळापत्रक ऐवजी अनुक्रमे प्रथम अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, त्यानंतर शिक्षण विस्ताराधिकारी पदोन्नती प्रक्रिया, सध्या कार्यरत असलेले मुख्याध्यापक यांच्या विनंती बदल्या, मुख्याध्यापक पदी प्रमोशन, अध्यापकांच्या बदल्या, आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचे समुपदेशन करून नियुक्ती द्यावी व शेवटी नवीन भरती झालेल्या शिक्षकांना नियुक्ती असा क्रम ठेवावा. अशी मागणी करण्यात आली आहे. वरील मागणीसाठी कोल्हापूर येथे गेलेल्या कार्यरत पात्र मुख्याध्यापकांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे समजते. दरम्यान आपल्यावर अन्याय होऊ नये यासाठी संघटना नेत्यांनी यासंदर्भात कायदेविषयक तज्ञांचा सल्ला घ्यावा अशा सूचना केल्याचे समजते. तसेच आपल्या मागण्यांसाठी मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी राज्याचे शिक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच शिक्षण सचिव यांची भेट घेणार असल्याचे समजते.

No comments:

Post a Comment