कोवाड येथील अभय ग्रामीण सह. पतसंस्थेत ३ कोटी ५८ लाखांचा गैरव्यवहार, २२ जणांवर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

28 May 2024

कोवाड येथील अभय ग्रामीण सह. पतसंस्थेत ३ कोटी ५८ लाखांचा गैरव्यवहार, २२ जणांवर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल


चंदगड : सी एल वृत्तसेवा

      कोवाड (ता. चंदगड) येथील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेत तब्बल ३ कोटी ५८ लाख १४ हजार ३९३ रुपये इतका गैरव्यवहार झाल्याची घटना लेखापरीक्षणातून समोर आली आहे. यावरून ज्ञानोबा कराड (अप्पर लेखापरीक्षक सहकारी संस्था) यांनी चंदगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून २१ संचालक व मॅनेजरसह २२ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. यातील ५ आरोपी मयत झाले आहेत. या घटनेने चंदगड तालुक्यासह जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

  या घटनेची चंदगड पोलिसातून मिळालेली माहिती अशी, यातील फिर्यादी हे महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग खाते लेखापरीक्षण विभागाचे अप्पर लेखापरीक्षक सहकारी संस्था कागल या पदावर कार्यरत असून सहकारी संस्थांच्या हिशेबी जमाखर्च कामकाजाचे लेखा परीक्षण करून कामकाजाचा अहवाल सादर करतात. अभय ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित कोवाड, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर या संस्थेचे १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२२ अखेर मुदतीचे वैधानिक लेखापरीक्षण उपलब्ध करून व खुलासावरून त्यांनी 31 जानेवारी 2024 रोजी पूर्ण केले असून संस्थेत गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले आहे हा गैरव्यवहार सन 2006 ते ३१ मार्च 2022 या जवळपास सोळा वर्षातील आहे यावरून काल दिनांक 27 मे २०२४ रोजी यातील दोषींवर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर कलम २०८/२०२४ भारतीय दंड विधान संहिता कलम ४२०, ४०६, ४०९, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

  लेखापरीक्षणानुसार गैरव्यवहार व गैरविनियोगाचा गोषवारा थोडक्यात पुढील प्रमाणे आहे. 

रोज कीर्दीवरील रोख शीलकेचा गैरवापर-₹ ८,३२,४१०,

सोने जिन्नस तारण कर्जामधील गैर व्यवहार- ₹ १४,८०,१६३ 

स्थावर तारण कर्ज खात्यातील गैरव्यवहार - ₹६,०५,०००

संस्था सभासद राजेंद्र महादेव पाटील निट्टूर, तालुका चंदगड यांची कर्ज उचल - ₹ १०,००,०००

कॅश क्रेडिट कर्ज अनियमित विनातारणी व पोट नियमबाह्य दिलेली रक्कम -₹ ५८,५६,९६०

नियमबाह्य गुंतवणूक -₹ २२,२३,१४१ 

स्थावर तारण कर्जावरील चुकीची व्याज आकारणी- ₹ २६,७३,१६८ 

कॅश क्रेडिट कर्जावरील चुकीची व्याज आकारणी - ₹ १,०६,५८,६१४. 

कर्जदार रुजवात अमान्य - ₹ ७८,३९९. 

रोख रक्कम नावे मात्र शाखा किर्दीस जमा दिसत नाही- ₹ ६,००,०००. 

रोज कीर्दीवरील रोख शीलकेचा गैरवापर करून अपहार - ५१,९००.

तारण सोने जिन्नस विक्रीतील शिल्लक - ₹ १,४८,९३९

वाहन तारण कर्ज - ₹ ४,३६,०८५ 

रोज किर्दीतील रोख शीलकेचा गैरवापर करून अपहार - ₹ १२,६६०.

शाखा सल्लागार मंडळ व नातेवाईक क यांचेकडील येणे कर्जे - ९१,५६,९५४. 

एकूण रक्कम- ₹ ३,५८,१४,३९३/- असा एकूण गैरव्यवहाराचा तपशील असून यासाठी जबाबदार ठरवण्यात आलेले आरोपी तथा तत्कालीन कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे गुलाबराव सुबराव कोले चेअरमन (रा. कोवाड), के सुबराव मष्णू कोले तत्कालीन चेअरमन (राहणार कोवाड), शिवाजी आप्पया माने व्हाईस चेअरमन (रा राजगोळी खुर्द), संचालक- परशराम विठोबा कांबळे (मांडेदुर्ग), कै दत्तात्रय सट्टुप्पा नाईक (होसुर), नागोजी रामू पाटील (कोवाड), दत्तात्रय भरमाजी पाटील (निट्टूर), शिवाजी धाकलू पाटील (नागरदळे), श्रीमती लक्ष्मी सुबराव कोले (रा. कोवाड), सौ सीता जक्काप्पा पाटील (जक्कनहट्टी), अशोक महादेव पाटील (किटवाड), यशवंत रामा वडर (दुंडगे), कै मारुती लक्ष्मण गोंधळी (मांडेदुर्ग), अर्जुन तुकाराम वांद्रे (कोवाड), कै महादेव रामा नरेवाडकर (किटवाड), कै धोंडीबा बारकू दळवी (कळसगादे), भागोजी लिंगाप्पा कागणकर (तावरेवाडी, ता चंदगड), विठोबा गोविंद कोकीतकर (दुंडगे) दादोबा कृष्णा सुतार (हुंदळेवाडी), सौ जयश्री चंद्रकांत वडर (भडगाव), रेणुका निवृत्ती हदगल (नागरदळे), तानाजी भरमाण्णा पाटील मॅनेजर (मांडेदुर्ग) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

  याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अली मुल्ला व सहकारी पोलीस ठाणे चंदगड हे करत आहेत.

No comments:

Post a Comment